अविद्यामंदिर!

By Admin | Updated: May 6, 2017 00:12 IST2017-05-06T00:12:41+5:302017-05-06T00:12:41+5:30

आपल्याकडच्या कोणत्याही लहान गावातले असावे तसे हे ‘मोठ्ठे’ कॉलेज. मोठ्या शहरातलेही मोठ्ठे कॉलेज याहून वेगळे नसतात. कॉलेजची इमारत

Aayavyamandir! | अविद्यामंदिर!

अविद्यामंदिर!

आपल्याकडच्या कोणत्याही लहान गावातले असावे तसे हे ‘मोठ्ठे’ कॉलेज. मोठ्या शहरातलेही मोठ्ठे कॉलेज याहून वेगळे नसतात. कॉलेजची इमारत भव्य. वर्ग हवेशीर असावेत म्हणून काचबंद खिडक्या; पण त्यांच्या काचा बहुतेक फुटलेल्या. वर्गात मोडक्या खुर्च्याच जास्त कारण आनंद दाखवायला खुर्च्यांवर नाचायचे आणि राग-संताप यांना वाट करून देण्यासाठी खुर्च्यांची फेकाफेकच विद्यार्थ्यांनी करायची ! वर्गाच्या पांढऱ्या भिंती आणि फळे यावर अर्वाच्य साहित्याचे विद्रूप प्रदर्शन !
शॉर्ट ब्रेकमध्ये कॉलेजच्या पटांगणात (कानाला सतत मोबाइल लावलेल्या) मुलामुलींचा समूह हेलकावत असतो. मुलांचे केस मानेपर्यंत वाढलेले तर मुलींचे केस मानेपर्यंत कापलेले ! डोळ्यांवर लहरणाऱ्या बटातून आपल्याकडे कोणाचे किती लक्ष आहे याचा अंदाज ते दोघेही घेत असतात. आर्ट्सच्या, कॉमर्सच्या मुलांकडे पेन, वह्या, पुस्तके, अभावानेच आढळतात. विज्ञान शाखेतील मुलांच्या पाठीला मात्र जड बॅग असते. यापैकी काही मुले साध्या कपड्यातली, तेल लावून भांग पाडणारी. काही मुली घट्ट वेण्या वगैरे घालतात. वह्या-पुस्तकांचे ओझे सावरत लायब्ररीत दंग असतात. अभ्यास करून, करिअरचे ध्येय बाळगत, आई-वडिलांच्या अपेक्षा त्यांना पूर्ण करायच्या असतात. इतर मुले अशा विद्यार्थ्यांना तोंडावर स्कॉलर म्हणतात तर पाठीमागे बावळट म्हणून शिक्का मारतात ! यात अडीच वर्षे एकाच वर्गात रेंगाळणारी, पहिल्या वर्षी शॉर्ट अटेंडन्स, दुसऱ्या वर्षी अभ्यासाला वेळच उरला नाही म्हणून ‘थर्ड इयर इन फर्स्ट इयर’ असे स्वत:विषयी त्यातील काही मुले अभिमानाने सांगत असतात. वर्गात जाणाऱ्या शिक्षकांच्या मागे ते निघतातही; पण बाकीची मुले त्यांचे मन:परिवर्तन करतात. शिकवणाऱ्या शिक्षकांपासून दूर पळणारी मुले काहींच्या भोवती कोंडाळे करतात. आज हे बंद उद्या ते बंद कसे ठेवायचे याविषयी त्यांचे मार्गदर्शन घेतात. कारण मोर्चे, आंदोलने या काळात प्राचार्यांना अशांचाच तर आधार वाटतो. विद्यार्थ्यांची जेव्हा मिटिंग भरते तेव्हा वर्ग झाले नाहीत तर परीक्षांचे काय होणार याच्या काळजीने काहींचे चेहरे काळवंडले असतात. कँटीन चांगले हवे. पिकनिक वरच्या वर असाव्यात. प्रेझेंटीची अट नसावी. या मागण्यांसाठी बाकीचे एकवटून चढ्या स्वरात बोलत असतात. मिटिंग संपताच अधिकतर मुले कोणत्याशा सिनेमा थिएटरकडे वळतात. त्यातील भडक नाचगाण्यांवरच्या चर्चेत ते दंग असतात. परीक्षा आली की अभ्यासू मुलांचे चेहरे काळजीने काळवंडलेले तर बाकीच्यांच्या चेहऱ्यावर अतीव प्रसन्नता असते. परीक्षा काही कारणाने पुढे ढकलल्या जातात. आपल्या विद्यामंदिरांमध्ये सारे काही आलबेल असल्याचा गोड समज मात्र सगळीकडे कायम असतो. शिक्षणमंत्रीही तृप्ततेने सांगत असतात, ‘आॅल इज वेल’, विद्यामंदिर हे हळूहळू अविद्यामंदिर होत चालले आहे, हे त्यांच्या गावीही नसते !

- डॉ. सौ. प्रज्ञा आपटे -

Web Title: Aayavyamandir!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.