एका महिलेचा एकटीनं ६० देशांचा प्रवास !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 09:31 IST2025-03-18T09:30:21+5:302025-03-18T09:31:08+5:30

फिरायला, पर्यटनाला जायला कोणाला आवडत नाही? पण मुख्य म्हणजे त्यासाठी वेळ पाहिजे, पैसा पाहिजे आणि त्याहीपेक्षा इच्छा आणि सोबतीला कोणीतरी पाहिजे. 

A woman's solo journey to 60 countries | एका महिलेचा एकटीनं ६० देशांचा प्रवास !

एका महिलेचा एकटीनं ६० देशांचा प्रवास !

इंग्लंडच्या वेस्ट ससेक्स काउंटीतली एक महिला सध्या चर्चेत आहे. कारण एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल ६०पेक्षा जास्त देश ती एकटीच फिरून आलेली आहे. पण ज्या ज्या ठिकाणी ती गेली, तिथली फक्त सौंदर्यस्थळं तिनं पाहिली नाहीत, त्या त्या देशांना केवळ हजेरी लावली नाही, तर या बहुतेक देशांत तिनं निवांत सुट्टी घालवली आहे आणि इतर लोक जे करत नाहीत, ते केलं आहे. 

इतके देश ती फिरली, पण तो तो देश खऱ्या अर्थानं समजून घेताना तिनं तो अक्षरश: पायाखाली घातला आहे. इतके देश तिनं पाहिले, या सगळ्या देशांविषयी तिचे अनुभव फारच चांगले आहेत, पण ती म्हणते, जगात असा एक देश किंबहुना असं एक शहर आहे, जिथे मी परत कधीच जाणार नाही. कोणता आहे हा देश आणि कोणतं आहे हे शहर?..

या महिलेचं नाव आहे गेराल्डिन जोआकिम. दरवर्षी साधारणत: चार वेळा ती परदेशात सुट्टी घालवते. त्यासाठीचं नियोजन तिनं आधीच केलेलं असतं. मायक्रोनेशियातील याप, ब्राझील, जपानमधील ओकिनावा, रशिया, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, मोजांबिक आणि इतर अनेक ठिकाणांची सफर तिनं केली आहे. गेराल्डिनच्या हृदयात एक ठसठस मात्र कायम आहे, ती म्हणते, जगात एकच ठिकाण असं आहे जिथे मी परत कधीच जाणार नाही. हे ठिकाण म्हणजे व्हेनेझुएलाची राजधानी काराकास!

गेराल्डिन सांगते, इथला प्रवास माझ्यासाठी एक दु:स्वप्न होतं. त्या दिवशी माझी फ्लाइट मध्यरात्री पोहोचली. मी एक कार बुक केली.  एअरपोर्टपासून शहरातील एका हॉटेलपर्यंत ती मला घेऊन गेली. दुसऱ्या दिवशी मी इस्ला मार्गारिटा नावाच्या एका बेटावर जाण्यासाठी निघाले. तिथे एअरपोर्टवर मी कारची वाट पाहत होते. एक तास गेला, दोन तास गेले, तीन तास गेले, वेळ जात होता, मी अस्वस्थ होत होते, माझ्या शरीरातलं त्राण संपलं, सहनशक्तीही संपली. अखेरपर्यंत कार आलीच नाही. हळूहळू एअरपोर्ट रिकामं होऊ लागलं. एक वेळ तर अशी आली, संपूर्ण एअरपोर्टवर मी एकटीच फक्त उरले होते..  

आता कोणाची मदत घ्यायची माझी इच्छा नव्हती. अखेर कशीबशी एका हॉटेलमध्ये मी पोहोचले. ते हॉटेल होतं की कोंडवाडा, हे कळायलाही मार्ग नव्हता. रूममध्ये प्रचंड घाण होती. दरवाजा खिळखिळा होता. आतून लावण्यासाठी त्याला कडीही नव्हती. शेवटी मी माझं सगळं सामान दरवाजाजवळं ठेवलं, जेणेकरून बाहेरून कोणालाही ते सहजपणे उघडता येऊ नये. रात्रभर मला झोप लागली नाही..

हे कमीच होतं. दुसऱ्या दिवशी एअरपोर्टजवळ एका मुलानं माझी बॅग हिसकावून घेतली आणि तो धावत सुटला. मीही जीव तोडून त्याच्या मागे धावत होते, पळताना अक्षरश: धाप लागली, पण मला बॅग सोडून देणं परवडणारं नव्हतं. कसंबसं मी त्याला गाठलंच, तर त्यानं एअरपोर्टमध्ये बेकायदेशीरपणे चेक-इन करण्याचा प्रस्ताव दिला. अनिच्छेनं मी त्याला काही पैसे दिले, माझी सुटका करून घेतली आणि इंग्लंडच्या फ्लाइटमध्ये बसले. व्हेनेझुएलाच्या नावानं मी आता कायमचा खडा लावला आहे!..

Web Title: A woman's solo journey to 60 countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Womenमहिला