मराठी साहित्यातल्या नव्या प्रयोगांची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 08:11 IST2025-02-21T08:11:19+5:302025-02-21T08:11:41+5:30
साहित्य संमेलनाच्या मुहूर्तावर मराठी साहित्याच्या चर्चेला नकारात्मकतेची किनार असते. तो चष्मा उतरवला, की दिसणाऱ्या नव्या प्रयोगांचा वानवळा!

मराठी साहित्यातल्या नव्या प्रयोगांची कहाणी
मेघना भुस्कुटे, लेखक, समीक्षक
मोबाइल्स आणि जेन-झींच्या जगात पुस्तकं संपली-संपली असा ओरडा होत असताना गेल्या काही वर्षांत मराठी पुस्तकांच्या जगात काही मस्त प्रयोग होताना दिसताहेत. त्यांपैकी काहींनी इंटरनेटचा कल्पक वापर करून घेतला आहे, तर काहींनी कागदी पुस्तकांची आणि पुस्तकांच्या रंजनक्षमतेची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.
‘बुकगंगा’ हे मराठी पुस्तकविक्री करणारं, मराठी पुस्तकांची पहिली पाच-सात पानं वाचून पुस्तक चाळल्याचा आभास निर्माण करणारं पोर्टल हा प्रयोग यशस्वी झाला. पुस्तकदुकानांची वानवा असल्यामुळे महाराष्ट्रातल्या, पुण्या-मुंबईबाहेरच्या वाचकांची भूक अनेकदा भागत नाही. फेसबुकवर अनेक एकांड्या, पुस्तकप्रेमी शिलेदारांनी पुस्तकविक्री करायला घेतली. एक व्हॉट्सॲप नंबर, जीपे करण्याची सोय, पुस्तकांच्या मुखपृष्ठांचे फोटो आणि पोस्टाच्या जाळ्याचा आधार - इतक्या सामग्रीवर ही विक्री दणक्यात चालू लागली. त्यात नवीन पुस्तकं होती, तशी जुनी आणि दुर्मीळ पुस्तकंही होती. पुस्तकाकडे निव्वळ एक विक्रीयोग्य वस्तू म्हणून न पाहता पुस्तकाची किंमत नीट समजू शकणाऱ्या जाणकार रद्दीवाल्याला जे स्थान पुस्तकवेड्यांच्या जगात असतं, त्याच्या जवळ जाणारा हा प्रकार होता, आहे. त्यात ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’चा किंचित सवंग थरार आहे, पण ग्लॅमरही आहे. घरबसल्या टपालानं पुस्तकं मिळवणारा हा प्रकार अनेकांच्या पथ्यावर पडला. त्यातून अभिषेक धनगर या पुस्तकवेड्याच्या ‘वॉल्डन पब्लिशर्स’सारख्या प्रकाशन संस्थाही सुरू झाल्या. उत्तम पुस्तकनिर्मिती करू लागल्या.
निव्वळ आणि दर्जेदार रंजन हे सूत्र डोळ्यांसमोर ठेवून काढलेलं ‘भास’ हे कागदी अनियतकालिक. भुताखेतांच्या, लढायांच्या, प्रेमाच्या, तपासाच्या, चोरांच्या आणि फसवाफसवीच्या, विज्ञानाच्या आणि अद्भुताच्या ‘गोष्टी’ हव्याहव्याशा वाटतात. पण त्यांची चणचण भासते. मग, आपणच त्या का छापू नयेत, अशा विचारानं ‘भास प्रकाशन’नं ते सुरू केलेलं. रंजनाला न लाजता त्याला प्राधान्य देणाऱ्या या प्रयोगाचं अनेक वाचकांनी मनापासून स्वागत केलं.
भूषण कोलते आणि श्रीपाल या दोघांनी कल्याणमध्ये सुरू केलेलं पुस्तकांचं दुकान आणि मग त्यातून जन्माला आलेली पपायरस ही प्रकाशन संस्था देखण्या पुस्तकनिर्मितीमुळे अनेकांचं लक्ष वेधून घेते आहे. पुस्तकाच्या आशयाइतकंच महत्त्व त्याच्या रंगा-रुपाला आणि काटक - सुघड बांधणीला असलं पाहिजे, असा आग्रह धरणाऱ्या भूषण आणि श्रीपादचा पुस्तकनिर्मितीबद्दलचा विचार लांब पल्ल्याचा आहे. भारताच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत निरनिराळ्या छापखान्यांपर्यंत पोचून, निरनिराळ्या प्रकारच्या कागदांचा वापर करून, बांधणी नेटकी आणि मजबूत राखून, पुस्तकाच्या दृश्य मांडणीवर वेळ नि कष्ट खर्चून, पुस्तकांचं आयुष्य नि सौंदर्य वाढवणारे अनेक प्रयोग त्यांनी केले आहेत.
‘अटकमटक’ हे मुलांसाठी असलेलं मराठी पोर्टल चालवणाऱ्या ऋषिकेश दाभोळकर यांनी ‘झीरो फाउंडेशन’च्या सोबतीनं ‘कुल्फी’ नावाचं मुलांसाठीचं छापील नियतकालिक सुरू केलं. अर्थपूर्ण चित्रं; सकस, रंजक लेखन; उच्च दर्जाची निर्मितीमूल्यं ही ‘कुल्फी’ची वैशिष्ट्ये. वाचकांनी आपल्या परिसरातल्या आणि गावातल्या शाळांसाठी ‘कुल्फी’ची वर्गणी सवलतीच्या दरात भरा, असं आवाहन केल्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक सरकारी आणि निम सरकारी शाळांपर्यंत ‘कुल्फी’ अल्पावधीत पोचला. त्याला तंत्रज्ञानाचं वावडं नाही. स्कॅनकोडसारख्या स्वस्त तंत्राचा वापर शिवाय लिखित शब्दाइतकाच - किंबहुना थोडं जास्तच झुकतं माप चित्रासारख्या शक्यताबहुल माध्यमाला दिलेलं. उमेश कुलकर्णींसारख्या चित्रपटकर्त्यांपासून माधुरी पुरंदरेंसारख्या ज्येष्ठ - जाणत्या साहित्यिकांपर्यंत आणि वसीमबार्री मणेरसारख्या अनेकांचं लेखन ‘कुल्फी’मध्ये असतं.
पुस्तक हे एकच मध्यवर्ती सूत्र ठेवून मारलेल्या गप्पांचा ‘पुस्तकगप्पा’ हा कार्यक्रम युट्यूबवर, तसंच स्पॉटिफायसारख्या ऑडिओ चॅनलवरही सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे. अस्तित्ववादी मराठी कादंबऱ्या, मायकल पोलनची अन्नविषयक पुस्तकं, शांता गोखलेंनी जेरी पिंटो यांच्या ‘एम ॲण्ड द बिग हूम’चं केलेलं भाषांतर, गौरी देशपांडे यांच्या कादंबऱ्या, रामायण आणि महाभारत… अशा वैविध्यपूर्ण विषयांवरच्या गप्पा - आणि अभ्यासपूर्ण चर्चा! - ‘पुस्तकगप्पां’मध्ये असतात तसेच हेमंत राजोपाध्ये, चिन्मय धारूरकर, माया पंडित, जेरी पिंटो, शांता गोखले... अशा अनेकानेक मान्यवर लेखकांचा आणि अभ्यासकांचा सहभागही! निव्वळ पुस्तकप्रेमाखातर फेसबुकवर ‘वाचनवेडा’ नामक ग्रुप चालवणारे विनम्र भाबळ, मराठीत ऑडिओबुक्स उपलब्ध करून देणारी ‘स्टोरीटेल’ची यशस्वी कहाणी, ‘ऐसी अक्षरे’सारखी अनेक व्हर्चुअल नियतकालिकं… अशा कितीतरी प्रयोगांबद्दल लिहिता येईल... हे प्रयोग यशस्वी होवोत आणि त्यातून पुढच्या प्रयोगांना बळ मिळो!