गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 07:48 IST2025-07-19T07:47:04+5:302025-07-19T07:48:42+5:30
महाराष्ट्रासमोर ‘हायड्रोपोनिक गांजा’चे मोठे आव्हान असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात केला. काय आहे हा नशेचा नवा प्रकार?

गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
- रवींद्र राऊळ, ज्येष्ठ पत्रकार
चार वर्षांपूर्वी घरातल्या फिशटँकमध्ये हायड्रोपोनिक गांजाची लागवड करून त्याचे सेवन करणाऱ्या एका इराणी विद्यार्थ्याला बंगळुरू पोलिसांनी अटक केली होती, तेव्हा हाच हायड्रो गांजा पुढे भारतात धुमाकूळ घालेल याची कल्पना पोलिसांना नव्हती. गंभीर बाब म्हणजे कोणतेही ड्रग्ज देशात येऊ नये यासाठी लावलेल्या कुंपणानेही हायड्रो गांजाची शेती खाल्ल्याचा उफराटा प्रकारही आता उघडकीस आला आहे.
आतापर्यंत भारतात ठिकठिकाणी कोट्यवधींचा हायड्रो गांजा जप्त करण्यात आला असला तरी हजारो कोटींचा हायड्रो गांजा हा गांजेकसांपर्यंत सुखेनैव पोहोचलाही आहे. खिशात मावेल अशा किलोभर हायड्रो गांजाची किंमत साधारण एक कोटी रुपये आहे; यावरून किती रकमेच्या हायड्रो गांजाचा धूर होत असेल याचा अंदाज येतो. ऑस्ट्रेलियात बेट भाड्याने घेऊन हायड्रो गांजाची शेती करणाऱ्या नवीन चिचकर याला मलेशियातून भारतात आणण्यात यश आले असले तरी केवळ एकटा नवीन चिचकर आणि त्याचे हस्तक इतकेच यात आरोपी नाहीत. आंतरराष्ट्रीय सिंडीकेटच्या मदतीशिवाय इतके मोठे ड्रग्ज रॅकेट सुरू शकत नाही. हे अजस्र रॅकेट उखडून काढण्यासाठी भारतातील सगळ्या अमली पदार्थविरोधी तपास यंत्रणांमध्ये समन्वय राखला जाईल की नाही, हा प्रश्न आहे. कारण ही केवळ एका राज्यापुरती समस्या नाही तर पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर संघटित गुन्हेगारीशी निगडित आहे. म्हणून तपास यंत्रणांना देशातील आणि देशाबाहेरील ड्रग्ज सिंडीकेट अशा दोन आघाड्यांवर लढावे लागणार आहे. नवी मुंबईतील एक रॅकेट उद्ध्वस्त झाले म्हणून बाजारात हायड्रो गांजाची तीव्र टंचाई भासेल, असे नाही. रिकामी झालेली जागा पटकावण्यासाठी कुणी ना कुणी इथे मौजूद आहेच.
आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाने कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणल्याने अन्न उत्पादन अधिक कार्यक्षम आणि शाश्वत झाले आहे. मात्र दुर्दैवाने याच तंत्रज्ञानाचा गैरवापर अमली पदार्थांच्या अवैध लागवडीसाठीही केला जात आहे. हायड्रोपोनिक गांजा हे त्याचे प्रमुख उदाहरण.
हायड्रोपोनिक्स म्हणजे मातीऐवजी नारळाच्या भुसाचे तंतू अथवा पाणी शोषून रोखू शकतात, असे तत्सम घटक वापरून उभारलेल्या बागा. गांजा वाढवण्याची ही एक आधुनिक आणि प्रगत पद्धत आहे. या तंत्रात वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असलेली सर्व पोषक तत्त्वे पाण्यात मिसळलेल्या द्रावणातून थेट मुळांना दिली जातात. हे तंत्रज्ञान नियंत्रित वातावरणात, ग्रीन हाऊससारख्या इनडोअर सेटअपमध्ये वापरले जात असल्याने तापमान, आर्द्रता, प्रकाश आणि पोषक तत्त्वांचे प्रमाण काटेकोरपणे नियंत्रित करता येते. या पद्धतीमुळे गांजाच्या वनस्पतीची वाढ जलद होते. गांजाची क्षमता म्हणजे टेट्राहायड्रोकानाबिनॉलचे प्रमाण वाढते. त्यामुळे तो नेहमीच्या गांजापेक्षा कैकपटीत ‘कडक’ होतो. साहजिकच त्याची मागणी वाढून बाजारात जास्त किमतीला विकला जातो. मातीचा वापर नसल्याने मातीतून पसरणाऱ्या कीटक आणि रोगांचा धोका कमी होतो. वर्षभर लागवडही करता येते. जेणेकरून जगभरातील ड्रग्ज तस्करांना अव्याहतपणे पुरवठा करणे अवैध उत्पादकांना शक्य होते. कमी वेळेत रॅकेटला मजबूत नफा आणि तो फुंकणाऱ्या गांजेकसांच्या छातीचा पार खुळखुळाच.
वर्षभरापूर्वी गोवा पोलिसांनी एका रशियन डीजेला ड्रग्ज तयार करणाऱ्या प्रयोगशाळेत हायड्रोपोनिक गांजाची रोपे वाढवून नंतर ती टेलिग्राम चॅनलद्वारे प्रामुख्याने रशियन लोकांना विकल्याच्या आरोपावरून अटक केली होती.
मुंबईत दोन इंडोनेशियन नागरिकांकडून २१ कोटींचा हायड्रो गांजा जप्त करण्यात आला. या व्यवहारातला परदेशी नागरिकांचा सहभाग मोठा आहे. थायलंड आणि अमेरिकेत याचे उत्पादन कायदेशीर करण्यात आले आहे. थायलंडमधील हायड्रो गांजा मणीपूर आणि दिमापूरमधून मोठ्या प्रमाणात ईशान्य सीमेवर पाठवला जातो. तेथून ट्रेन, बस, खासगी वाहनांद्वारे दिल्लीत पोहोचता केला जातो. विमानतळ, बंदरे हेही तस्करीच्या हायड्रो गांजाचे एंट्री पॉइंट आहेत. त्याशिवाय नेपाळचा महामार्ग तर नेहमीप्रमाणे सगळ्यांसाठीच खुला आहे आणि डार्क वेबवरही खरेदी- विक्रीचे व्यवहार होतात. प्रत्यक्ष डिलिव्हरी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुरिअर सेवाही दिमतीला असतातच.
या प्रकरणातून उघडकीस आलेली विशेष बाब म्हणजे यात आढळलेला टपाल, कस्टम आणि पोलिस अधिकाऱ्यांचा सहभाग आणि शेवटच्या घटका मोजणाऱ्या कॅन्सर रुग्णांचा यात झालेला वापर. इतक्या मोठ्या घाऊक प्रमाणात सरकारी अधिकारी सापडण्याची ही पहिलीच आणि धक्कादायक घटना. एकीकडे तपासयंत्रणेतील ही कीड हुडकून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, हेही नसे थोडके. त्याचबरोबर सरकारी वर्दी घालून प्रत्यक्षात ड्रग्ज तस्करी करण्याचे प्रकार म्हणजे सडलेल्या व्यवस्थेचा अस्वस्थ करणारा पुरावाच!
हायड्रो गांजाचा धोका हे सार्वजनिक आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित एक व्यापक आव्हान आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार, अंमलबजावणी यंत्रणा आणि समाज यांच्यात एकत्रित आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत.
ravirawool66@gmail.com