अणुसंशोधनाचा ९९ टक्के वापर शांततेसाठी
By Admin | Updated: August 2, 2015 04:19 IST2015-08-02T04:19:41+5:302015-08-02T04:19:41+5:30
दुसऱ्या महायुद्धावेळी अमेरिकेने आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकले आणि ही दोन शहरे बेचिराख करून टाकली.

अणुसंशोधनाचा ९९ टक्के वापर शांततेसाठी
- अ.पां. देशपांडे (लेखक मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह आहेत.)
दुसऱ्या महायुद्धावेळी अमेरिकेने आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकले आणि ही दोन शहरे बेचिराख करून टाकली. अणुबॉम्ब हल्ल्यांचा परिणाम आजही या दोन शहरांना भोगावा लागत असून, स्वत:ला संरक्षित करण्यासाठी अनेक देशांनी
अणुचाचण्या हाती घेतल्या आहेत. मात्र असे असले तरीही अणुशस्त्र आणि अणुसंशोधनाचा ९९ टक्के वापर हा आजघडीला विश्वशांतीसाठी केला जातो आहे.
भारताचा विचार करायचा झाला तर १९४५ साली डॉ. होमी भाभा यांनी अणुशस्त्र आणि अणुसंशोधनाबाबत चिंतन सुरू केले. १९४७ साली पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान झाल्यानंतर होमी भाभा यांच्या विचारविनिमयाला जोड मिळाली. शिवाय नेहरू यांनी अणुसंशोधनास पाठिंबाही दिला. अणुसंशोधनाचा वापर शांततेसाठी कसा करता येईल? याबाबत नेहरू आणि होमी भाभा यांच्यात चर्चा झाल्या. चर्चेअंती अणुसंशोधनाला उत्तरोत्तर जोड मिळत गेली. कालांतराने आपल्याकडे ‘टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेटल रिसर्च’ची स्थापना करण्यात आली. त्यामुळे संशोधनाला वेग मिळाला. तेथे ‘अॅटॉमिक न्युक्लिअर रिअॅक्टर’ची निर्मिती करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे यासाठी प्रा. भालचंद्र उदगावकर हे स्वत: फ्रान्समध्ये दोन वर्षांच्या अभ्यासासाठी गेले. त्यानंतर काही कालावधीतच आपल्याकडे ‘भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर’ची स्थापना करण्यात आली.
‘भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर’ची स्थापना झाल्यानंतर येथेही ‘अॅटॉमिक न्युक्लिअर रिअॅक्टर’च्या निर्मितीसाठी सुरुवात करण्यात आली. याचवेळी प्रा. उदगावकर यांच्या अधिपत्याखाली पहिल्या बॅचचे प्रशिक्षणही सुरू झाले. त्यानंतर अणुसंशोधनात देशाने झेप घेतली. आजघडीचा विचार केला तर अणुसंशोधनामुळे अनेक क्षेत्रांचा विकास झाला आहे. आरोग्य क्षेत्र असो वा कृषी क्षेत्र प्रत्येक क्षेत्राला अणुसंशोधनामुळे चालना मिळाली आहे. कर्करोगातील संशोधनाला अणुसंशोधनाने जोड दिली आहे. कोल्हापूरजवळ भुईमुगावर अणुसंशोधनाचा प्रयोग झाला आहे. धान्य साठवण्यासाठी अणुसंशोधन लाखमोलाची भूमिका बजावत आहे. विशेषत: परळमधील कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट हेदेखील ‘भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर’ चालवत आहे. अणुसंशोधनाचा इंडस्ट्रीयल क्षेत्रासाठी वापर केला जातो आहे. एक्स-रे शिवाय मेडिकलमध्येही अणुसंशोधन लाखमोलाची भूमिका बजावत आहे. तेल वाहून नेणाऱ्या वाहिन्या साफ करण्यासह जाळे विस्तारण्यासासाठी अणुसंशोधनाचा वापर केला जातो आहे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अणुबॉम्ब हा अणुसंशोधनाचा अगदी छोटा भाग आहे. शत्रूला भीती घालण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
परंतु समजा एकदा अणुबॉम्ब बनवून ठेवला तर त्याचे पुढे काय, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. म्हणून जगभराचा विचार करता अगदी आजघडीला अमेरिकासुद्धा अणुसंशोधनाचा वापर हा निरनिराळ्या क्षेत्रांसाठी करत आहे.