चाकू हल्ल्यात तरुणाला गंभीर दुखापत; फागणे गावातील घटना, दोघांवर गुन्हा

By देवेंद्र पाठक | Updated: October 24, 2023 16:04 IST2023-10-24T16:04:03+5:302023-10-24T16:04:14+5:30

पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूने सपासप वार करुन त्याला गंभीर दुखापत केल्याची घटना धुळे तालुक्यातील फागणे गावात रविवारी रात्री घडली.

Youth seriously injured in knife attack; Incident in Phagane village, crime against two | चाकू हल्ल्यात तरुणाला गंभीर दुखापत; फागणे गावातील घटना, दोघांवर गुन्हा

चाकू हल्ल्यात तरुणाला गंभीर दुखापत; फागणे गावातील घटना, दोघांवर गुन्हा

धुळे : पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूने सपासप वार करुन त्याला गंभीर दुखापत केल्याची घटना धुळे तालुक्यातील फागणे गावात रविवारी रात्री घडली. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर याप्रकरणी सोमवारी धुळे तालुका पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

फागणे गावातील मुकेश बडगुजर (वय ३४) या तरुणाने फिर्याद दाखल केली. त्यानुसार मुकेश बडगुजर हे वाहनचालक आहेत. फागणे गावातील छाजेड पेट्रोल पंपाजवळ रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांना दोन जणांनी अडविले. मागील भांडणाची कुरापत काढून वाद घातला. वाद विकोपाला गेल्याने शिवीगाळ करत हाताबुक्याने मारहाण करण्यात आली. जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली.

एवढ्यावरच न थांबता एकाने चाकू काढून मुकेशवर सपासप वार केले. यात मुकेश याच्या नाकावर, ओठावर आणि डोक्याला मारल्याने गंभीर दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर सोडून दोघांनी पळ काढला. ही घटना लक्षात येताच त्याला तत्काळ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर याप्रकरणी सोमवारी दुपारी ४ वाजता धुळे तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार दोन जणांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास पोलिस नाईक ठाकूर करीत आहेत.

Web Title: Youth seriously injured in knife attack; Incident in Phagane village, crime against two