अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार, धुळे परिसरातील घटना, पोलिसांत गुन्हा
By देवेंद्र पाठक | Updated: April 15, 2023 17:38 IST2023-04-15T17:36:33+5:302023-04-15T17:38:40+5:30
अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात शहर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार, धुळे परिसरातील घटना, पोलिसांत गुन्हा
धुळे : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल रेसिडेन्सी पार्कसमोर भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने दिलेल्या धडकेत तरुणाला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
विजय लक्ष्मण वाघ (रा. विश्वकर्मा नगर, नटराज टाॅकीजमागे, धुळे) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार संजय धुडकू वाघ (वय २८, रा. म्हाडा वसाहत, मोहाडी उपनगर, धुळे) या तरुणाला शुक्रवारी सकाळी १० ते साडेदहा वाजेच्या सुमारास रेसिडेन्सी पार्कसमोर मालेगावकडून शिरपूरकडे भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात शहर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.