मध्य प्रदेशच्या तरुणाला गावठी कट्ट्यासह पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 22:39 IST2021-02-01T22:38:50+5:302021-02-01T22:39:12+5:30
धुळे शहर पोलीस : दोन जिवंत काडतूससह ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त

मध्य प्रदेशच्या तरुणाला गावठी कट्ट्यासह पकडले
धुळे : शहरातील स्टेशन रोडवरील दसेरा मैदान भागात पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तरुणाला शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हा तरुण मध्य प्रदेशातील खेतिया येथील असून त्याच्याकडून २ जिवंत काडतूससह ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शहरातील दसेरा मैदानजवळील रेल्वे क्रॉसिंगजवळ असलेल्या आशीर्वाद शॉपिंगनजीक सोनू निकुंभ हा तरुण पिस्तूल विक्रीसाठी आल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळाली. माहिती मिळताच सापळा लावण्यात आला. पोलिसांनी सोनू शांतीलाल निकुंभ (१९, रा. नंदा पटेल चौक, खेतिया, ता. पानसेमल, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी आणि अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचा गावठी कट्टा, दोन जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तूलसह काडतूस, मोबाइल आणि त्याने आणलेली दुचाकी असा एकूण ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक नाना आखाडे, कर्मचारी मच्छिंद्र पाटील, योगेश चव्हाण, कमलेश सूर्यवंशी, अविनाश कराड, राहुल गिरी, नीलेश पोतदार, प्रदीप धिवरे, तुषार मोरे यांनी कारवाई केली.