धुळे : साक्री तालुक्यात निजामपूर पोलिसांनी गुरुवारी रात्रीसापळा रचून एका तरुणाला गावठी कट्टासह शिताफिने पकडले़ २० हजार रुपये किंमतीची गावठी कट्टा जप्त करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली़पोलीस सुत्रांनुसार, ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने अवैधशस्त्र बाळगणा-यांविरुध्द पोलिस अधीक्षक यांच्याकडून कारवाई करण्याबाबत त्यांना आदेशीत केले होते. एक जण गावठी कट्यासह येणार असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ यांना मिळाली़ त्यानुसार जैताणे गावातील वासखेडी रोडवर ३१ डिसेंबर रोजी रात्री निजामपूर पोलिसांनी सापळा लावला होता़ मुकेश नानाभाऊ मोरे (२९, रा. जयभिम सोयसायटी (भामेर) ता.साक्री जि.धुळे) हा संशयास्पदरित्या मिळुन आला. त्याला ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टमध्ये एक देशी बनावटी गावठी पिस्तुल मिळून आली़ त्याची किंमत २० हजार रुपये इतकी आहे़ त्याच्या विरोधात पोलीस कर्मचारी आशिष कागणे यांनी फिर्याद दाखल केल्याने गुन्हा दाखल झाला़ त्याला अटक करण्यात आली़सदरची कारवाई पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदिप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ व पोलीस उपनिरीक्षक सुनिल वसावे, मोनिका जेजोट, पोलीस कर्मचारी ईश्वर शिरसाठ, आशिष कागणे, भटु पाटील, निशिगंध गवळे यांनी कारवाई केली़ पोलीस उपनिरीक्षक मोनिका जेजोट पुढील तपास करीत आहेत.
वासखेडी रोडवर सापळा लावून गावठी कट्यासह तरुण गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 21:57 IST