भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने नंदुरबारचा तरुण ठार
By देवेंद्र पाठक | Updated: January 20, 2024 17:32 IST2024-01-20T17:31:43+5:302024-01-20T17:32:38+5:30
शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे ते मेथीदरम्यान घडली घटना.

भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने नंदुरबारचा तरुण ठार
देवेंद्र पाठक,धुळे : भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हा अपघात शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे शिवारात १८ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी घडला होता. प्रशांत देवाजी बागुल (वय ३२, ह.मु. नंदुरबार) असे मृत तरुणाचे नाव आहे.
साक्री तालुक्यातील भोरटेपाडा येथील प्रशांत बागुल हा तरुण दुचाकीवरून (क्र. एमएच ४३ एयू ९८७२) धुळे येथून नंदुरबारकडे भरधाव जात होता. शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे ते मेथीदरम्यान, त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो दुचाकीसह रस्त्यावर फेकला गेला. त्यात त्याच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाली. अपघाताची ही घटना १८ डिसेंबर २०२३ रोजी घडली होती. अपघातानंतर त्याला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना गुरुवारी त्याचा मृत्यू झाला.
साक्री तालुक्यातील भोरटेपाडा येथील खासगी वैद्यकीय व्यवसाय करणारे नितीन देवाजी बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिंदखेडा पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०४ अ, २७९, ३३७, ३३८ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद शुक्रवारी दुपारी करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत गोरावडे घटनेचा अधिक तपास करीत आहेत.