कांद्यावर पीळ तर कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:42 IST2021-09-17T04:42:59+5:302021-09-17T04:42:59+5:30
दुसाणे : साक्री तालुक्यातील दुसाणे गावासह परिसरातील सर्वच शेतकऱ्यांचे कांदा पीक हे पीळ रोगामुळे पूर्णतः उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत ...

कांद्यावर पीळ तर कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव
दुसाणे : साक्री तालुक्यातील दुसाणे गावासह परिसरातील सर्वच शेतकऱ्यांचे कांदा पीक हे पीळ रोगामुळे पूर्णतः उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
यावर्षी आधीच संपूर्ण माळमाथा परिसरात पाऊस खूप कमी प्रमाणात झाल्याने नदी-नाल्यांना पाणी आलेले नाही तर विहिरींनी तळ गाठलेला आहे. तेवढ्या पाण्यावर कांद्याचे बियाणे शेतकऱ्याने टाकले होते. परंतु, कमी पाऊस व धुक्यामुळे कांद्याचे रोप पूर्णतः नष्ट झाले होते. त्यानंतरही शेतकऱ्यांनी हार न मानता महाग व दर्जेदार रोप विकत घेऊन कांदा पिकाची लागवड केली होती. परंतु, या नवीनच उत्पन्न झालेल्या पीळ रोगामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा कांदा उद्ध्वस्त झाला आहे. ज्यात कांदा लागवडीनंतर जवळपास एक महिन्यानंतर त्यांना पीड पडायला सुरुवात होते व नंतर संपूर्ण कोवळा कांदा सडून खाक होताना सर्व शेतांमध्ये दिसत आहे. त्यावर सर्वच महागातल्या महाग औषधांची फवारणी करूनदेखील त्यावर काही फरक पडताना दिसत नसल्याने सर्वच शेतकऱ्यांनी कांदा पिकाला वाऱ्यावर सोडून दिले आहे.
अशीच काहीशी गत कापसाचीदेखील लाल्या रोगामुळे झाली आहे. कापूस लागवडीनंतर त्याला फुलफुगडी लागण्याच्या तोंडावर सर्व कापूस पीक लाल पडून त्यावरील फुलफुगडी पूर्णतः खाली गळून ते पीकदेखील संपूर्ण उद्ध्वस्त झालेले आहे. परिसरातील या दोन्ही प्रमुख पिकांनी शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांसमोर चिंतेचे मोठे वादळ उभे राहिले आहे. यावर शासनाने विचार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी सर्वच शेतकऱ्यांची मागणी आहे.
प्रतिक्रिया
माझ्या शेतातील जवळपास चार एकरमधील कांदा पीक पीळ रोगामुळे संपूर्ण नष्ट झाले आहे. ज्याच्यावर मी आतापर्यंत अंदाजे एक ते दीड लाख रुपये खर्च केले असून, त्यावरील उत्पन्न शून्य झाले आहे. माझ्यासह परिसरातील संपूर्ण शेतकऱ्यांची अशीच परिस्थिती आहे.
- शामजी श्रावण महाले (माजी चेअरमन, विविध कार्यकारी सोसायटी व प्रगतशील शेतकरी, दुसाणे)