The work of Dr. Ambedkar is unanimous | डॉ.आंबेडकरांचे कार्य सर्वसमावेशक
dhule


डॉ.आंबेडकरांचे कार्य सर्वसमावेशक
डॉ.अमोल बागूल : दीक्षा फाऊंडेशनतर्फे शासकीय वसतिगृहात समेमिनार
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सर्वसमावेशक व व्यापक स्वरूपाचे आहे. त्यांनी दुरदृष्टि ठेवून न्याय, स्वातंत्र्य, बंधुता व समता या चार तत्वांची गुंफण करून संविधान तयार केले. २१व्या शतकातील नागरिकांना आपल्या महापुरुषांनी काय सांगितले, त्यांनी केलेल्या उपदेशाचे पालन व वर्तन करता येईल का यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अमोल बागुल यांनी केले. शिंदखेडा येथे दीक्षा फाऊंडेशनतर्फे शासकीय वसतिगृहात सेमिनार व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
यावेळी उद्घाटक व प्रमुख वक्ते म्हणून डॉ.बी.आर. चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार नेतेंद्रसिंह राजपूत, नगर पंचायत प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे, विवेक डांगरीकर आदी उपस्थित होते. कार्यक्रम शासकीय मुलामुलींच्या वसतिगृहात गुरुवारी सकाळी १० ते ५ वाजेदरम्यान डॉ.आंबेडकरांचे विचार विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी घेण्यात आला होता.
यावेळी अमोल बागुल म्हणाले की, फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आज शेतकऱ्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. सर्वात जास्त शेतकरी आत्महत्येचे प्रमाण महाराष्ट्रात आहे. डॉ.बाबासाहेबांच्या आर्थिक विचारांकडे बघताना बाबासाहेबांची शेतकऱ्यांप्रती असलेली दूरदृष्टी निदर्शनास येते. शेतकºयाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शेतकºयांनी सामुदायिक शेतीचा स्वीकार केल्यास शेती किफायतशीर ठरेल. तसेच शेतीसोबत जोडधंदा केला पाहिजे म्हणजे आर्थिक बळ मिळेल असे मत बाबासाहेबांचे होते, असे बागूल यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.बी.आर. चौधरी यांनी केले. याप्रसंगी डॉ.चौधरी, डॉ.राहूल वाघ यांनी मनोगत व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाविषयी सुरेश मोरे व प्रणाली मराठे यांनी विचार मांडले. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत प्रा.घनश्याम थोरात व सहकाºयांचा भीमगीत व अस्पृश्यता निवारण आणि राष्ट्रीय एकात्मतेवर जनजागृतीपर गायनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीक्षा फाउंडेशनचे अध्यक्ष शशिकांत पाटोळे, सचिव हेमंत मोरे, रविंद्र पाटोळे व संजय पाटोळे यांनी परिश्रम घेतले.

 

Web Title: The work of Dr. Ambedkar is unanimous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.