स्त्रीस वस्तू म्हणून न गणता मानाचे स्थान मिळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 15:13 IST2020-03-14T15:13:09+5:302020-03-14T15:13:32+5:30
शिंदखेडा एम.एच.एस.एस. महाविद्यालय : महिला व युवती जागर कार्यशाळेत निघाला सूर

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : येथील एम.एच.एस.एस. कनिष्ठ महाविद्यालयात महिला व युवती जागर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी स्त्रीस वस्तू म्हणून न गणता तिला मानाचे स्थान मिळावे असा सूर कार्यशाळेतून निघाला.
आजच्या महिला शिक्षित झाल्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. पुरुष प्रधान संस्कृती असलेल्या समाजामध्ये स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात स्त्रीचे समाजामध्ये असलेले स्थान आजही दुय्यम आहे. विशेषता ग्रामीण भागामध्ये हे चित्र आजही ठळकपणे पाहायला मिळते. त्यामुळे स्त्रीला समाजामध्ये वस्तू म्हणून न गणता तिलाही मानाचे स्थान मिळावे, असा सूर येथील एम.एच.एस.एस. कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित महिला व युवती जागर कार्यशाळेत काढण्यात आला. या कार्यशाळेत महाविद्यालयातील तीनशेच्यावर विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य आर.डी. राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. अंधश्रद्धा, मानसिक गुलामगिरी, समाजातील अनिष्ट चालीरीती या बंधनात अडकलेल्या स्त्रीला प्रातिनिधिक स्वरूपात मुक्त करून अनोख्या पद्धतीने या कार्यशाळेचे उद़्घाटन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील प्रा.टी.आर. शहा व शिक्षिका शेख यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य राजपूत म्हणाले, योग्य ठिकाणी अन्यायाविरुद्ध विरोध करण्याची क्षमता आजच्या स्त्रीमध्ये निर्माण झाली पाहिजे. घरांमध्ये निर्णयात स्त्रीला सहभागी करून घेण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले.
पहिल्या सत्रात प्रा.परेश शाह यांनी स्त्री आणि अंधश्रद्धा या विषयाची मांडणी केली. यावेळी युवतींच्या प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम घेण्यात आला. दुसऱ्या सत्रात तन्वी खैरनार हिने जन्माची कहाणी विषद केली. देवेंद्र नाईक यांनी महिला सुरक्षेसाठी असणाºया कायद्याची आणि आधुनिक मोबाईलचे वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर महिलांवर होणारे अत्याचार आणि त्याविषयीच्या कायदेशीर प्रक्रिया बाबतचे पोस्टर प्रदर्शन पाहण्यास खुले करण्यात आले.
तिसºया सत्रात गटचर्चा घेण्यात आली. त्यामध्ये स्त्री-पुरुष समानता, प्रसार माध्यमांमधील स्त्री प्रतिमा, आधुनिकतेच्या नावाखाली परंपरांचे उदात्तीकरण आणि आरोग्य या विषयांवर गटचर्चा घेण्यात आली. या चर्चेचे सादरीकरण साक्षी पवार, करुणा गिरासे, पूजा पवार, जागृती भामरे, नीलिमा देवरे, धनश्री धनगर या विद्यार्थिनींनी केले. गटसमन्वयक म्हणून प्रा.दीपक माळी, प्रा.जी.के. परमार, प्रा.डी.एस. माळी, प्रा.संदिप गिरासे, प्रा.बी.पी. कढरे यांनी काम पाहिले. प्रा. वैशाली परदेशी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेचा समारोप ‘हम होंगे कामयाब’ या गीताने करण्यात आला.