महिलेचा विनयभंग, आईवर चाकूने हल्ला; शिंदखेडा तालुक्यातील घटना, पाच जणांविरोधात गुन्हा
By अतुल जोशी | Updated: June 18, 2023 18:14 IST2023-06-18T18:14:29+5:302023-06-18T18:14:45+5:30
शेतात कामाला येत नाही, असे म्हणत अनैतिक संबंधांचा संशय घेऊन दोन महिलांसह पाच जण घरात अनधिकृतपणे घुसले.

महिलेचा विनयभंग, आईवर चाकूने हल्ला; शिंदखेडा तालुक्यातील घटना, पाच जणांविरोधात गुन्हा
धुळे: शेतात कामाला येत नाही, असे म्हणत अनैतिक संबंधांचा संशय घेऊन दोन महिलांसह पाच जण घरात अनधिकृतपणे घुसले. त्यांनी शिवीगाळ करत काठीने पीडित महिलेसह तिच्या आईला मारहाण केली. यावेळी महिलेचा विनयभंगही केला. एकाने चाकूने वार केल्याने महिलेच्या आईला दुखापत झाली. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजता घडली. या प्रकरणी सायंकाळी नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
पीडित महिलेने नरडाणा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास दोन महिलांसह पाच जणांनी लाठ्या - काठ्यांसह घरात प्रवेश केला. एकाच्या हातात चाकू होता. घरात पीडितेसह तिची आई होती. त्यांना पाहून तुम्ही आमच्या शेतात कामाला का येत नाही, असे म्हणत एकाशी तुझे अनैतिक संबंध आहेत, असा आरोप करत शिवीगाळ सुरू केली. महिलेच्या आईवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढविला. तिच्यावर चाकूने वार केल्याने उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. आईला मारहाण करत असताना तिला वाचविण्यासाठी आलेल्या महिलेला पकडून तिला खाली पाडण्यात आले. तिचा सर्वांसमोर विनयभंग करण्यात आला. तिलाही काठीने मारहाण केल्याने डोक्याला दुखापत झाली. दमदाटी व शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या घटनेनंतर दोन महिलांसह पाच जणांनी घटनास्थळावरून पळ काढला.
दरम्यान, जखमी झालेल्या आई-मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर पीडित महिलेने नरडाणा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पाच जणांविरोधात शनिवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज कुवर करत आहेत.