अवघ्या तीन दिवसात लुटारु जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 22:29 IST2019-11-14T22:29:08+5:302019-11-14T22:29:25+5:30
स्थानिक गुन्हे शाखा : २ कोटी ६५ लाखांचे दागिने जप्त, तिघांच्या मुसक्या आवळल्या

अवघ्या तीन दिवसात लुटारु जेरबंद
धुळे : अंधाराचा फायदा घेत एका सराफ व्यापाºयाला मारहाण करुन त्याच्याजवळील बॅग हिसकावून पोबारा केल्याची घटना रविवारी रात्री देवपुर भागात घडली होती़ यात तिघांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे़ त्यांच्याजवळून २ लाख ६५ हजार १०० रुपयांचे दागिने हस्तगत केली आहेत, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ यांनी दिली़
देवपुरातील पितांबर नगरात सोने-चांदीचे व्यापारी गोपाल सोनार यांनी रविवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन दागिने बॅगमध्ये भरले़ ते घरी जात असताना अंधाराचा फायदा घेऊन मोटारसायकलीवर आलेल्या लुटारुंनी त्यांना अडविले़ मारहाण करीत त्यांच्याकडील बॅग लांबविली होती़ याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश बोरसे, हनुमान उगले, रफिक पठाण, महेंद्र कापुरे, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, कुणाल पानपाटील, अशोक पाटील, गौतम सपकाळे, उमेश पवार, विशाल पाटील, रविकिरण राठोड, तुषार पारधी, किशोर पाटील, मनोज बागुल, श्रीशैल जाधव, राहुल सानप, मयूर पाटील, केतन पाटील, महेश मराठे, दीपक पाटील यांनी मिळालेल्या माहितीनुसार सापळा लावला़ त्यानंतर मधुकर राजाराम वाघ, बापू उर्फ दीपक विठ्ठल वाणी, सुनील गुलाब मालचे या तिघांना शिताफीने ताब्यात घेण्यात यश मिळविले़ त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी लूट केल्याची कबुली दिली आहे़ त्यांच्याजवळून ४१़६६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १ किलो ९६३ ग्रॅम ६९० मिली वजनाची चांदी असे एकूण २ लाख ६५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे़
दरम्यान, लुटीच्या या गुन्ह्यात आणखी संशयित वाढण्याची शक्यता डॉ़ भूजबळ यांनी व्यक्त केली़