नानांचा दौरा ‘काँग्रेस’ला देणार का ‘ऑक्सिजन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:23 IST2021-06-27T04:23:35+5:302021-06-27T04:23:35+5:30
हायकमांडच्या आदेशानुसार दिल्लीला जावे लागणार असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा धुळे दौरा फक्त शिरपूर, शिंदखेडा आणि धुळे ...

नानांचा दौरा ‘काँग्रेस’ला देणार का ‘ऑक्सिजन’
हायकमांडच्या आदेशानुसार दिल्लीला जावे लागणार असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा धुळे दौरा फक्त शिरपूर, शिंदखेडा आणि धुळे तालुक्यापुरता मर्यादित धावता दौरा झाला. त्यामुळे ज्याठिकाणी काँग्रेसची परिस्थिती चांगली आहे त्या साक्री तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी मात्र वाटच पाहत राहून गेले. या धावत्या दौऱ्यात प्रदेशाध्यक्षांनी काही गोष्टी सांगितल्या, त्यात भाजपत गेलेले सर्वच प्रमुख नेते पक्षात परततील, जिल्हा कार्यकारिणीतील बदलाची सुरुवात या प्रमुख गोष्टी जर तंतोतत तशा घडल्या तर काँग्रेसची परिस्थिती खरोखरच सुधारेल, असे काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटल्याशिवाय राहणार नाही; पण तसेच होईल, असेही नाही, त्यामुळे ‘नानां’चा दौरा धुळे जिल्हा काँग्रेसला ‘ऑक्सिजन’ ठरेल का, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
काँग्रेसच परतीचा प्रवास - प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात शिरपूरपासून केली. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शिरपूर तालुक्यात आज पक्षाची परिस्थिती काय आहे, सर्वांनाच माहिती आहे. पक्षाचे तालुक्यातील सर्वेसर्वा व जिल्ह्याचे नेते आमदार अमरीशभाई पटेल यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये पदाधिकारी सोडा कार्यकर्ते गोळा करणे कठीण झाले आहे. त्यामुळे जि.प., पं.स. निवडणूक असो की अन्य काँग्रेसला कुठेच स्थान नाही. अशा ठिकाणापासून दौऱ्याची सुरुवात करून त्यांनी भाजपत गेलेले नेते हे दबावामुळे गेले आहेत. ते शरीराने भाजपत आहेत, मनाने आजही काँग्रेसमध्ये आहे. ते सर्व प्रमुख नेते लवकरच काँग्रेसमध्ये परततील असा आशावाद पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दाखवून नानांनी चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
दोंडाईचा बैठक - शिरपूरनंतर दोंडाईचा येथे आयोजित शिंदखेडा तालुका काँग्रेसची आढावा बैठकीत माजी मंत्री व ज्येष्ठ नेते डाॅ. हेमंत देशमुख काँग्रेसच्या व्यासपीठावर पाहून काहींना आश्चर्याचा धक्का बसला. कारण डाॅ. देशमुख यांचे बंधू माजी नगराध्यक्ष डाॅ. रवींद्र देशमुख यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर डाॅ. हेमंत देशमुख हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते. मात्र, शरद पवार यांचा धुळे जिल्हा दौरा हा दोन वेळा जाहीर होऊन रद्द झाला. त्यामुळे फक्त डाॅ. हेमंत देशमुख काँग्रेसमधील राहतील का, असा प्रश्नच आहेच.
पत्रकार परिषद - दोन ठिकाणी आढावा बैठकीनंतर धुळ्यात पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात अनेक ठिकाणी जिल्हा कार्यकारिणीत फेरबदल करण्यात येतील, त्याची सुरुवात धुळे जिल्ह्यापासून करण्याचे जाहीर केले. या घोषणेमुळे पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आता तरी आपल्याला न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली; परंतु जिल्हा कार्यकारिणीत फेरबदल करताना पडतीच्या काळातही पक्षाची साथ देणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे पुनर्वसन होणेही गरजेचे आहे. यासंदर्भात दोंडाईचा आढावा बैठकीत डाॅ. हेमंत देशमुख यांनी विद्यमान जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांची महामंडळावर किंवा अन्य पदावर नियुक्तीची मागणी करीत याला वाचा फोडली. त्यामुळे यांच्या पुनर्वसनाचा मुद्दाही कार्यकारिणीत फेरबदल करताना महत्त्वाचा ठरणार आहे. कारण तसे झाले नाही तर अशा पदाधिकाऱ्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण होऊन पक्षविरोधी भूमिका घेण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
साक्री का सुटला - दौरा धावता झाला असला तरी प्रदेशाध्यक्ष हे मालपूरपर्यंत गेले. मालपूर येथून साक्रीला का गेले नाहीत. प्रदेशाध्यक्षांना घाई होती, तरी ते रात्री उशिरापर्यंत धुळ्यातच होते. मग ते मालपूर येथून पूर्वनियोजित दौऱ्यानुसार साक्रीला तेथील कार्यक्रम करून पाऊणतास धुळ्याला पोहोचू शकले असते; पण तसे न केल्याने साक्री तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
जि.प. निवडणुकीच्या दृष्टीने साक्री आणि धुळ्याला जाताना नेर, कुसुंबा येथील कार्यकर्त्यांनाही भेटता आले असते; पण ते का केले नाही, यामागील कारण काय, याबाबत उलटसुलट चर्चा आहे.
या सर्व कारणांमुळे नानांचा दौरा धुळे जिल्ह्यासाठी ऑक्सिजन ठरेल का, हा प्रश्न स्वाभाविकच आहे.
- राजेंद्र शर्मा