पुन्हा उभा राहिल का काँग्रेसचा ‘बालेकिल्ला’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:33 IST2021-02-07T04:33:34+5:302021-02-07T04:33:34+5:30
एकेकाळी धुळे जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. जिल्ह्यात कोणालाही उभे केले तरी तो निवडून येईल, असे सांगितले जायचे. ...

पुन्हा उभा राहिल का काँग्रेसचा ‘बालेकिल्ला’
एकेकाळी धुळे जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. जिल्ह्यात कोणालाही उभे केले तरी तो निवडून येईल, असे सांगितले जायचे. पण हळूहळू काँग्रेसमधील अंतर्गत गटतटाच्या राजकारणामुळे एक-एक करून बालेकिल्ल्याचे बुरुज ढासळत गेले. परिस्थिती ही येऊन ठेपली की लोकसभा मतदारसंघ हातातून गेला. नंतर जिल्ह्यातील पाचपैकी फक्त एकाच विधानसभा मतदारसंघापुरती काँग्रेस शिल्लक राहिली. जिल्हा परिषद, तीन पंचायत समिती, महापालिका आणि नगरपालिका, नगरपंचायत सर्वच ठिकाणी काँग्रेसचा नगरसेवक व जि.प. सदस्य बोटावर मोजण्याइतकेच राहिले. स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेसला उमेदवार शोधूनही मिळत नाही, अशी परिस्थिती आहे.
काँग्रेसचे एक-एक करून सर्वच दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसमधील ॲंकर गटातील एक-दोन शिलेदारच आता पक्षात आहे. दुसरा जवाहर गटाने आपला धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ शाबूत ठेवण्यात यश मिळवित जिल्ह्यात काँग्रेसला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यांचा विचार केला तर शिरपूरमध्ये काँग्रेस ऑक्सिजनवर आहे. शिंदखेड्यात जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांच्या प्रयत्नाने काँग्रेसचे अस्तित्व उभे आहे. साक्री तालुक्यात पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बांधवांच्या बळावर पंचायत समिती काबीज केली आहे. धुळे तालुक्यात जवाहर गटाचे वर्चस्व आहे. मात्र महापालिकेत काँग्रेसची परिस्थिती दयनीय आहे. अशा परिस्थिती धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या पक्षाने संपूर्ण राज्यात पक्ष संघटन मजबूत करण्याची जबाबदारी प्रदेश कार्याध्यक्षपदाची धुरा सोपविली आहे. आता आमदारांवर राज्यासोबतच धुळे जिल्ह्यातही पक्ष संघटन मजबूत करून पुन्हा सुगीचे दिवस आणण्याची मोठी जबाबदारी आहे.
आमदार कुणाल पाटील यांना प्रथमच राज्यस्तरावर मोठी जबाबदारी पक्षातर्फे सोपविली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास चुडामण पाटील यांचे चिरंजीव कुणाल पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत केलेल्या भाषणाने प्रभावित होऊन राहुल गांधी यांनी कुणाल पाटील यांना दिल्लीला बोलावून घेतले आणि लोकसभा निवडणूक लढण्यास सांगितले. लोकसभा निवडणुकीत कुणाल पाटील यांना पराभव पत्करावा लागला. परंतु त्याने खचून न जाता विधानसभा निवडणुकीत कुणाल पाटील यांनी काँग्रेसकडून पुन्हा उमेदवारी केली आणि सलग दुसऱ्यांदा विजय मिळविला.
मंत्रिपदाची हुलकावणी - तरुण आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे कुणाल पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु काँग्रेसने त्यांना पक्ष संघटन तयार करण्याची मोठी जबाबदारी दिली. प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून कुणाल पाटील यांना जिल्हा नव्हे तर संपूर्ण राज्यात प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी यामुळे मिळाली आहे.
गटतटाचे राजकारण सोडावे लागेल - आमदार कुणाल पाटील यांना जिल्ह्यात काँग्रेस पुन्हा उभी करण्यासाठी गटातटाचे राजकारण संपवावे लागेल. तसे पाहाता जिल्ह्यात आता ॲंकर गटात काही अपवाद वगळता कोणीच शिल्लक नाही. पण तरीही अजूनही जिल्ह्यात काँग्रेसच्या मोठ्या निर्णयात ॲंकर गटातील पक्ष सोडून गेलेले दिग्गज नेतेच करतात, असे पक्षातीलच नेते व कार्यकर्ते दबक्या आवाजात बोलतांना दिसतात. आजही जिल्ह्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या त्यांच्याच म्हणण्यानुसार होत असतात, असेही ते कार्यकर्ते सांगतात. आमदार कुणाल पाटील यांना पक्षातील निष्ठावंतांना शोधून नवीन तरुणांची फळी जिल्ह्यात निर्माण करावी लागणार आहे. तसे पाहता आमदार कुणाल पाटील यांनी लोकसभा व विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर पक्ष संघटनात्मक बैठकीत जिल्ह्यात चारही तालुक्याचे दौरे केले आहेत. त्यांचे वडील ज्येष्ठ रोहिदास पाटील यांचेही जिल्ह्यात सर्वच तालुक्यात समर्थकांची एक फळी कार्यरत आहेत. या सर्वांसोबतच ॲंकर गटाशी जुळलेेल्या पदाधिकाऱ्यांनाही विश्वासात घेऊन काम करावे लागणार आहे. पक्षाच्या बैठका या काँग्रेस भवनातच झाल्या पाहिजे. तसेच तालुका व जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड करतानाही समतोल साधावा लागणार आहे. त्यासाठी त्यांना राज्यासाेबतच धुळे जिल्ह्यालाही वेळ द्यावा लागेल. जिल्ह्यातील गटातटाच्या राजकारणाचा लागलेला डाग पुसून पुन्हा सर्व एकदिलाने आणि एकजुटीने काम करतील, यासाठी प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील. पक्षाचे सर्वच फ्रंट पुन्हा रिॲक्टिव्ह करावे लागतील. हे सर्व अवघ्या काही दिवसात होणे शक्य नाही. हळूहळू पण योग्यरितीने होऊ शकते, असे काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटते. आता पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष व आमदार कुणाल पाटील कशापद्धतीने हे घडवून आणतात हे पाहावे लागेल.