पत्नीचा जाच, धमक्याने कंटाळून पतीची गळफास घेत आत्महत्या
By देवेंद्र पाठक | Updated: January 30, 2024 18:18 IST2024-01-30T18:17:41+5:302024-01-30T18:18:23+5:30
नवे भदाणे येथील घटना, तालुका पोलिसात गुन्हा

पत्नीचा जाच, धमक्याने कंटाळून पतीची गळफास घेत आत्महत्या
देवेंद्र पाठक, धुळे : पत्नीकडून सतत होणाऱ्या जाचाला कंटाळून पतीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना धुळे तालुक्यातील नवे भदाणे गावात २६ जानेवारी २०२४ रोजी घडली. गोकूळ श्रावण श्रीराम (वय २४) असे मयताचे नाव आहे. तर, अंजली गोकूळ श्रीराम (वय २१, रा. हटकरवाडी, चितोड रोड, धुळे) असे गुन्हा दाखल झालेल्या पत्नीचे नाव आहे.
गोपाल श्रावण श्रीराम (वय २०, रा. नवे भदाणे, ता. धुळे) याने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, भाऊ गोकूळ श्रीराम आणि त्याची पत्नी अंजली यांचा विवाह झाला होता. परंतु, त्यांच्यात किरकोळ कारणावरून सतत वाद हाेत असायचे. पत्नीकडून पतीला त्रास दिला जात होता. हा प्रकार २१ जून २०२३ पासून ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत वेळोवेळी घडत होता. सतत पैशांची मागणी करणे, खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे असे प्रकार सुरू होते. सततच्या जाचाला कंटाळून शेवटी गोकूळ श्रीराम याने २६ जानेवारी रोजी गळफास लावून आपले जीवन संपविले. आत्महत्येचा प्रकार लक्षात येताच त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. डाॅक्टरांनी तपासून मयत घोषीत केले.
अंतिम विधीचे सर्व सोपस्कार पूर्ण केल्यानंतर गोपाल श्रीराम याने धुळे तालुका पोलिस स्टेशनला सोमवारी दुपारी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, संशयित अंजली गोकूळ श्रीराम हिच्या विरोधात भादंवि कलम ३०६ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक धनवटे करीत आहेत. दरम्यान, भाऊ गोकूळ याने आत्महत्या केली नसून त्याला आत्महत्या करण्यास वहिनी अंजली हिने भाग पाडल्याचा आरोप गोपाल श्रावण श्रीराम याने केला आहे.