व्हीलचेअर नावालाच, दिव्यांग, ज्येष्ठांची बसस्थानकात कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:44 IST2021-02-05T08:44:07+5:302021-02-05T08:44:07+5:30

धुळे : येथील बसस्थानकात व्हीलचेअर नावालाच असल्याचे चित्र आहे. बसस्थानकातील नियंत्रणात कक्षात व्हीलचेअर उपलब्ध आहे. मात्र, त्याबाबत दिव्यांग व ...

Wheelchair namesake, Divyang, seniors exercise at the bus stand | व्हीलचेअर नावालाच, दिव्यांग, ज्येष्ठांची बसस्थानकात कसरत

व्हीलचेअर नावालाच, दिव्यांग, ज्येष्ठांची बसस्थानकात कसरत

धुळे : येथील बसस्थानकात व्हीलचेअर नावालाच असल्याचे चित्र आहे. बसस्थानकातील नियंत्रणात कक्षात व्हीलचेअर उपलब्ध आहे. मात्र, त्याबाबत दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना माहितीच नसल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळले आहे. धुळे बसस्थानकात दिवसभर प्रवाशांची वर्दळ असते. ६००पेक्षा अधिक बसेस बसस्थानकावर ये - जा करतात. धुळे शहरातून महत्त्वाचे दोन महामार्ग जातात. तसेच दोन राज्यांच्या सीमा जिल्ह्याला लागलेल्या आहेत. त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने जिल्ह्याचे महत्त्वाचे स्थान आहे. येथील बसस्थानकातून इतर राज्यात जाणाऱ्या बसेसची संख्याही मोठी आहे. तसेच येथून इतर शहरात दररोज ये - जा करणाऱ्या प्रवाशांची संख्यादेखील लक्षणीय आहे. त्यात दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे.

बसस्थानकात रॅम्प उभारण्यात आला आहे. त्याचा दिव्यांग बांधवांना उपयोग होत आहे. तसेच रोटरी क्लबकडून व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्थानकातील नियंत्रण कक्षात व्हीलचेअर ठेवण्यात आली आहे. दिव्यांग प्रवाशांनी मागणी केली तर व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती मिळाली. मात्र, बहुतेक दिव्यांग प्रवाशांना स्थानकात व्हीलचेअर उपलब्ध असल्याबाबत माहिती नाही. त्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. व्हीलचेअर उपलब्ध असल्याबाबतचा फलक बसस्थानकात लावण्याची गरज आहे. त्यामुळे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळू शकतो.

व्हीलचेअर नियंत्रण कक्षात

बसस्थानकात व्हीलचेअर उपलब्ध आहे. दिव्यांग प्रवाशांना त्याबाबत माहिती नाही. नियंत्रण कक्षात व्हीलचेअर ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. व्हीलचेअर असूनही दिव्यांग बांधवांना त्रास सहन करावा लागत आहे. व्हीलचेअर उपलब्ध असल्याबाबत माहिती देणे गरजेचे आहे.

रॅम्प उभारला

बसस्थानकात रॅम्प उभारण्यात आला आहे. मात्र, कोपऱ्यात असल्यामुळे बऱ्याच प्रवाशांना त्याचा लाभ घेता येत नाही. तसेच रॅम्पजवळच पडलेल्या लोखंडी पाईपमुळे अडथळा निर्माण झाला आहे. तसेच जवळच दुचाकी लावण्यात येत असल्याने रॅम्पचा वापर करणे कठीण जाते.

प्रतिक्रिया -

रॅम्प कोपऱ्यात असल्यामुळे त्याकडे लक्ष जात नाही. रॅम्प दर्शनी भागात केला असता तर ज्येष्ठ नागरिकांना जास्त मदत झाली असती. मला माहीत असल्याने नियमित रॅम्पचा वापर करते.

- कमल बोरसे, ज्येष्ठ नागरिक

व्हीलचेअरबाबत कोणतीही माहिती नाही. धुळे बसस्थानकातून जळगाव येथे नियमित ये - जा करीत असतो. व्हीलचेअर मिळाली तर त्रास कमी होईल. रॅम्प असलेल्या ठिकाणी व्हीलचेअर उपलब्ध करावी.

- सुरेश पाटील, दिव्यांग

बसस्थानकात रॅम्प उभारण्यात आला आहे. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक त्याचा वापर करतात. तसेच रोटरी क्लब यांच्याकडून व्हीलचेअर प्राप्त झाली आहे. नियंत्रण कक्षात व्हीलचेअर उपलब्ध असते. मागणी केल्यानंतर दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर दिली जाते. दिव्यांग बांधवांना त्याचा फायदा होतो.

- अनुजा दुसाने,

आगार प्रमुख

Web Title: Wheelchair namesake, Divyang, seniors exercise at the bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.