यंदाच्या बजेटने मला काय दिले रे भाऊ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 19:37 IST2021-02-02T19:36:56+5:302021-02-02T19:37:11+5:30
कररचनेत बदल न केल्याने करधारकांना दिलासा : युवक, गृहिणी व शेतकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

यंदाच्या बजेटने मला काय दिले रे भाऊ?
बजेट ट्वेंटीवन - धुळे : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. कररचनेत कोणतेही बदल होणार नसल्याने करदात्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र शेतकरी, युवक, गृहिणी व खाजगी क्षेत्रातील नागरिकांनी अर्थसंकल्पाबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कोरोनामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. लॉकडाऊनच्या काळात अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले होते. यंदाच्या अर्थसंकल्पात आयकर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र कर रचना पूर्वीप्रमाणेच ठेवल्याने करदात्यांनी समाधान व्यक्त केले आहे. स्टार्टअपबाबत कोणतीही मोठी घोषणा न झाल्याने तरुणाईने नाराजी व्यक्त केली आहे. कापसावरील स्टॅम्प ड्युटी वाढवल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे; मात्र दीडपट हमीभाव मिळेल याबाबत साशंकता व्यक्त केली आहे.
अर्थसंकल्पातून मोठ्या सवलती मिळालेल्या नाहीत, मात्र आयकरात वाढदेखील झाली नाही. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. तसेच रस्ते, रेल्वे व पायाभूत सुविधांच्या निधीत महाराष्ट्राला झुकते माफ दिले आहे. यामुळे पायाभूत सुविधांचा विकास होण्यास मदत होईल.
- नरेंद्र नहार, व्यापारी
कापसावरील कस्टम ड्युटी वाढवल्याने कापसाचे भाव काही प्रमाणात वाढतील. मात्र शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याची घोषणा पूर्ण करण्यात कितपत यश मिळेल याबाबत शंका वाटते. कृषी क्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतूद होईल अशी अपेक्षा होती. पण, कोणतीही तरतूद न झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.
- ॲड. प्रकाश पाटील, कृषीभूषण शेतकरी
स्टार्टअपबाबत मोठी घोषणा होईल अशी तरुणांना अपेक्षा होती. मात्र त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याने तरुण व्यवसायाच्या संधी शोधात आहेत. व्यवसायासाठी दिल्या जाणाऱ्या कर्जपुरवठ्याच्या योजनांचा लाभ कमी तरुणांना मिळतो.
- मनोज चिंचोरे, युवक
वाहनांचे सुटे भाग महाग होणार असल्याचे अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले आहे. कोरोनामुळे व लॉकडाऊनमुळे व्यवसायावर मोठा परिणाम झालेला आहे. मागील वर्षी ९ महिने पूर्णपणे व्यवसाय बंद होता. वाहन खराब झाल्यास दुरुस्तीसाठी जादा पैसे मोजावे लागतील, त्यामुळे निराशा झाली.
- गोपाल वाघ, ऑटोचालक
मागील वर्षीचीच कर रचना ठेवण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. कोरोनामुळे आयकरातील सूट कमी होईल असे वाटत होते. मात्र त्यात बदल न झाल्याने दिलासा मिळाला आहे.
- राहुल अग्रवाल, व्यापारी
निराधार ज्येष्ठ नागरिकांना आयकर भरावा लागणार नाही अशी घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. ही घोषणा स्वागतार्ह आहे. मात्र बँकेत ठेवी असलेल्या ज्येष्ठांनाही आयकरातून सुटका मिळायला हवी होती.
- शांताराम पाटील, ज्येष्ठ नागरिक
कोरोनाकाळात आमचा रोजगार पूर्णपणे बुडाला होता. अर्थसंकल्पात असंघटित क्षेत्रातील व्यावसायिक कामगारांना दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र त्याबाबत घोषणा झाली नाही.
- गौतम अमृतसागर, भाजीपाला विक्रेता
तांब्याच्या वस्तू महाग होणार आहेत. मात्र विम्याचे हफ्ते व विजेचे बिल स्वस्त होणार असल्याची माहिती मिळाली. सध्या विजेचे बिल जास्त येत आहे. विजेचे बिल कमी आले तर चांगले होईल.
- सुवर्णा पाटील, गृहिणी
महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्र व पायाभूत सुविधांच्या विकासाला अर्थसंकल्पात महत्त्व देण्यात आले आहे. उद्योग क्षेत्राला गती मिळाली तर अधिक रोजगार निर्मिती व्हायला मदत होईल.
- योगेश सोनवणे, खासगी नोकरदार
अर्थसंकल्पात पेट्रोलवरील सेस वाढवण्यात आला आहे. त्याचा ग्राहकांना कोणताही तोटा होणार नाही. मात्र पेट्रोल व डिझेलवर कोरोना काळात लावलेला अधिभार कमी होईल अशी अपेक्षा होती. मात्र तशी कोणतीही तरतूद झाली नाही.
- राकेश जगताप, पेट्रोलपंप चालक