आम्ही मटनावर ताव मारलेलाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 12:47 IST2020-08-07T12:47:42+5:302020-08-07T12:47:59+5:30
जि.प.सभेनंतरची मटन पार्टी : अनेक सदस्यांची सावरासावर सुरू, विरोधी गटाने साधला निशाणा

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभे दरम्यान काही सदस्यांनी ऐन श्रावणात व ज्या दिवशी श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होत होते, त्याचदिवशी मटनावर ताव मारल्याचे माध्यमांमध्ये प्रसिद्ध होताच, सदस्यांवर टीका होऊ लागली. त्यामुळे मटन रिचविणाऱ्या सदस्यांनी आता सावध पवित्रा घेतला आहे. आम्ही मटनावर ताव मारलाच नाही असे काही सदस्य सांगत आहे. त्यांनी मटन खाल्ले नाही तर तीन बोकडांचे मटन कोणाच्या पोटात गेले असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
जिल्हा परिषदेत प्रथमच भाजपची स्वबळावर सत्ता आलेली आहे. कोरोनाचे कारण पुढे करीत जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा प्रथमच जि.प. आवाराच्या बाहेर झाली. शहरापासून लांब होत असलेल्या सभेमुळे सत्ताधारी पक्षातील काही सदस्यांना मटनावर ताव मारण्याचा मोह आवरता आला नाही. यासाठी तीन बोकडांची कुर्बानी देण्यात आली. मटनावर ताव मारत असतांना सत्ताधारी पक्षातील काही सदस्यांना श्रावणाचा व ज्या दिवशी अयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होत आहे, त्या पवित्र दिवसाचाही विसर पडला.
सदस्यांनी मटन रिचवल्याचे वृत्त सोशल मीडियामध्ये व्हायरल होताच, अशा सदस्यांवर टीका सुरू झाली. अनेकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. काहींनी तर त्यांनी पक्षाच्या नितीमुल्याचीही आठवण करून दिली. मटन खाऊन प्रभू श्रीराम यांची प्रतिमा पूजन करणे म्हणजे किळसवाणा प्रकार आहे अशा प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. माध्यमांमध्ये होत असलेल्या टीकेनंतर यातील काही सदस्यांना पश्चातापाची उपरती येऊ लागली आहे. तर काहींना याबाबत विचारणा केली असता, पवित्र श्रावण महिन्यात आम्ही मटन खाल्लेच नाही असा पवित्रा काहींनी घेऊन कानावर हात ठेवले आहे. सदस्यांनी मटन खाल्ले नाही तर तीन बोकडांचे मटन कोणाच्या पोटात गेले असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.