आम्ही सारी माणसं.. आणि या सर्वांची माणुसकी, गरजूंना दिला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:39 IST2021-04-28T04:39:00+5:302021-04-28T04:39:00+5:30
प्रशांत पवार : ग्रामीण रुग्णालयात पाणी देतात पिंपळनेर येथील बाबात फ्रेंड सर्कल ग्रुपचे प्रशांत भटू पवार व सदस्य हे ...

आम्ही सारी माणसं.. आणि या सर्वांची माणुसकी, गरजूंना दिला मदतीचा हात
प्रशांत पवार : ग्रामीण रुग्णालयात पाणी देतात
पिंपळनेर येथील बाबात फ्रेंड सर्कल ग्रुपचे प्रशांत भटू पवार व सदस्य हे कोरोनाच्या काळात रुग्णांना कोविड रुग्णालयात दररोज दोन वेळेस पाणीपुरवठा करीत असतात. तसेच कोविड रुग्णाचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारासाठी लागणारी सर्व तयारी या ग्रुपचे सदस्य करीत असतात. तसेच कोविड रुग्णाला मदत पाहिजे असल्यास ते वाहन चालविण्यासाठीही पुढे येतात. यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना दिलासा मिळत आहे.
संभाजी अहिरराव : गरजूंना देतात भोजन
राजे छत्रपती इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन संभाजी अहिरराव हे पहिल्या कोरोना लाटेसोबत दुसऱ्या कोरोना लाटेतदेखील मदतीसाठी पुढे आले आहेत. रुग्णांना बेड मिळवून देण्यापासून ते गोरगरीब गरजूंना जास्तीचे भोजन बनवून त्यांची जेवणाची व्यवस्था करणे, कोविड रुग्णांना जेवण पुरविणे, गरजूंना किराणा, मास्क, सॅनिटायझर देणे तसेच आर्थिक बाबतीत सहकार्य करीत आहेत. आज समाजावर मोठे संकट उभे आहे. अशा काळात मानव सेवा हाच धर्म असल्याने त्यांना मदत करणे ते आपले कर्तव्य समजून काम करीत असल्याचे ते सांगतात.
प्रमोद गांगुर्डे : रुग्णांना सर्वतोपरी मदत करतात
रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णासह त्याचे नातेवाईकही घाबरून जातात. अशावेळी त्यांना कोणीतरी धीर देण्याची, डॅाक्टरांशी बोलण्याची गरज असते. येथील प्रमोद गांगुर्डे, गौतम देशमुख, पप्पु गांगुर्डे हे रुग्णाच्या नातेवाइकांनी फोन केल्याबरोबर रुग्णालयात जातात. तेथे डॅाक्टरांशी बोलून त्यांची सर्व व्यवस्था करतात. रुग्णाचा मृत्यू झाल्यास, अंत्यसंस्कारासाठीही हे सदस्य मदत करीत असतात.
कुणाल बेनुस्कर : प्लाझ्मा दान करून महिलेचे प्राण वाचविले
पिंपळनेर येथील साने गुरुजी प्राथमिक विद्यामंदिरचे शिक्षक कुणाल बेनुस्कर यांनी मालेगाव येथील महिलेचे प्राण वाचविण्यासाठी मध्यरात्री पिंपळनेर ते मालेगाव प्रवास करून प्लाझ्मा दान केला. बेनुस्कर यांच्या आईवर असा प्रसंग ओढवला होता, त्या वेळी प्लाझ्माने आईचे प्राण वाचल्याची जाणीव होती, मालेगाव येथील महिलेचा प्राण वाचविण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना प्लाझ्मा थेरपीचा सल्ला दिला. अशावेळी कुणाल बेनुस्कर यांनी तातडीने मालेगाव गाठत प्लाझ्मा दान केला. त्यामुळे महिलेचे प्राण वाचू शकले.