कोरोना काळातच नागरिकांना पाणीटंचाईचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:37 IST2021-04-02T04:37:50+5:302021-04-02T04:37:50+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे तलावातील पाणीसाठा केवळ एक ते दीड महिने पुरेल एवढाच आहे. जूनपर्यंत पावसाचे आगमन न झाल्यास ...

कोरोना काळातच नागरिकांना पाणीटंचाईचे संकट
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे तलावातील पाणीसाठा केवळ एक ते दीड महिने पुरेल एवढाच आहे. जूनपर्यंत पावसाचे आगमन न झाल्यास शहराला पुन्हा पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. अक्कलपाडा व नकाणे तलावातील उपलब्ध जलसाठ्यात महापालिकेला शहरासह हद्दवाढीतील अकरा गावांची तहान भागवावी लागणार आहे. गेल्या वेळेस पाऊस कमी झाल्याने नकाणे तलाव भरण्यासाठी अक्कलपाडा प्रकल्पाच्या पाटचरीतून पाणी सोडण्यात आले होते. मात्र, पाण्याचे वेगात बाष्पीभवन होत असल्याने पाण्याची पातळी खालावली आहे़
शहरातील गळती थांबेना
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह तसेच जलवाहिनी लिकेजद्वारे दिवसाला हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाहून जाते. पाण्याच्या नासाडीनंतर दुरुस्ती होत असल्याने तोपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. नियोजन नसल्यामुळे नागरिकांना उशिरा पाणीपुरवठा केला जातो.
पाणीचोरी रोखण्याचे आव्हान
महापालिकेला पाणीपुरवठ्याचा भार डोईजड झाला असल्याने अवैध नळधारकांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करीत विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे.
हद्दवाढीतही पाणीटंचाईचे संकट
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांमध्ये सद्य:स्थितीत जूनपर्यंत पुरेल इतका जलसाठा उपलब्ध असला तरी हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या काही गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांची टँकरद्वारे तहान भागविण्याची वेळ आली आहे. महापालिकेत गावाचा समावेश झाल्यानंतर सुविधा मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र, मूलभूत प्रश्न सुटत नसल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.