व्यवस्थापकासह वेटरने लावला हॉटेल मालकाला चुना, ४ लाखांची फसवणूक
By देवेंद्र पाठक | Updated: October 14, 2023 18:46 IST2023-10-14T18:46:01+5:302023-10-14T18:46:38+5:30
देवपुरातील घटना : काउंटरमधून लांबविले जात हाेते वेळोवेळी पैसे

व्यवस्थापकासह वेटरने लावला हॉटेल मालकाला चुना, ४ लाखांची फसवणूक
देवेंद्र पाठक, धुळे : व्यवस्थापक आणि वेटर यांनी आपापसात संगनमत करुन हॉटेलमधील रोजच्या हिशेबात फरक दाखवून सुमारे ३ ते ४ लाखांची रक्कम परस्पर गडप करण्याचा प्रकार चव्हाट्यावर आला. यात ३ ते ४ लाखांची फसवणूक झाली. हा प्रकार फेब्रुवारी २२ ते एप्रिल २२ या कालावधीत घडला. दरम्यान, हॉटेल मालक काळे यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती.
यावर चौकशीअंती देवपूर पोलिस ठाण्यात शुक्रवारी मध्यरात्री दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विद्यानगरीत राहणारे पद्मसिंग राजेंद्र काळे (वय ३७) यांनी देवपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, देवपुरातील दत्त मंदिर चौकात काळे यांच्या मालकीचे पृथ्वीराज नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये फेब्रुवारी २०२२ ते एप्रिल २०२२ या कालावधीत अमाेल नामदेव कोळी (वय ३५, रा. मोगलाई, साक्री रोड, धुळे) हा व्यवस्थापक म्हणून, तर हिरामण देविदास पवार (वय ५२, रा. कानुश्री मंगल कार्यालयजवळ, धुळे) हा वेटर म्हणून काम करत होता. या दोघांनी आपसात संगनमत करून वेळोवेळी हॉटेलच्या रोजच्या हिशेबात फरक दाखविला.
तसेच, वेटर हिरामण पवार याने कॅश काउंटरवर उपस्थित असलेले व्यवस्थापक अमोल कोळी याच्याकडे येऊन २० ते ५० रुपये सुट्टे देऊन त्या बदल्यात २०० ते ५०० रुपयांच्या चलनी नोटा घेऊन जात असे. अशा प्रकारे या दोघांनी हॉटेल मालक पद्मसिंग काळे यांच्या लक्षात आपला अपहार येऊ नये म्हणून हातचलाखी केली. वेटर पवार हे व्यवस्थापक अमोल कोळी याच्याकडे ग्राहकाचे बिल देऊन उर्वरित रक्कम ग्राहकाला परत देण्यासाठी जात आहे, असे भासवायचा. अशा प्रकारे अपहार करून दोघांनी मिळून हॉटेल मालकाची सुमारे ३ ते ४ लाखांत फसवणूक केली.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर पद्मसिंग काळे यांनी देवपूर पोलिस ठाणे गाठले आणि फिर्याद दाखल केली. त्यानुसार मध्यरात्री साडेबारा वाजता भादंवि कलम ४०८, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ५०६ (२), ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस हेड कॉन्स्टेबल मोराणीस घटनेचा तपास करीत आहेत.