विठ्ठल आवडी प्रेमभाव, विठ्ठल नामाचा टाहो...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:03 IST2019-11-08T12:02:51+5:302019-11-08T12:03:17+5:30
कार्तिकी एकादशी : मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम; विद्युत रोशणाई करुन सुशोभिकरण

dhule
धुळे : शहरात व तालुक्यात कार्तिकी एकादशीनिमित्त विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त मंदिर परिसरात स्वच्छता व रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
जीटीपी कॉलनी मंदिर
धुळे - देवपूरातील जी.टी.पी. कॉलनीतील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात एकादशी निमित्त शुक्रवारी महापूजा व प्रसाद वाटप आणि कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सकाळी ६.३० ते ८.३० जिल्हा नियोजन अधिकारी वाडेकर यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा होणार आहे. सकाळी ९ ते अखंड प्रसाद वाटप व देवदर्शन तर रात्री ८.३० ते १०.३० ह.भ.प. संध्या माळी सुरतकर यांचे कीर्तन होणार आहे. वरील सर्व कार्यक्रमाचा शहर व परिसरातील सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीतर्फे करण्यात आले आहे.
दत्तवायपूर
दत्तवायपूर - शिंदखेडा तालुक्यातील दत्तवायपूर येथे कार्तिकी (प्रबोधिनी) एकादशी निमित्ताने विठ्ठल मंदिरात विधीवत पूजेसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने किर्तनाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी पहाटे सहा वाजता अभिषेक महाआरती, सायंकाळी हरिपाठ व रात्री नऊ वाजता ह.भ.प.गुलाब महाराज लोणकर यांचे किर्तन होईल. एकादशीला परिसरातील भाविक दशॅनासाठी मोठ्या संख्येने येत असल्याने त्यांच्यासाठी दर्शन रांग व इतर सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत. यावेळी मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप निर्माण होते. सदर उत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी ह.भ.प.परिवार, भजनी मंडळ, स्वाध्याय परिवार व ग्रामपंचायत आदी परिश्रम घेत आहेत.
श्रीक्षेत्र विठ्ठलधाम येथे कार्यक्रम
कार्तिकी (प्रबोधिनी) एकादशी निमित्ताने ८ नोव्हेंबर रोजी श्रीक्षेत्र विठ्ठलधाम, श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर, वलवाडी, धुळे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
यात सकाळी ५ वाजता अभिषेक व काकड आरती, ८ वाजता ंआयडीबीआयचे शाखा व्यवस्थापक भूषण किशोर जाधव यांच्या हस्ते सपत्नीक महाआरती, दुपारी १२ वाजता संदीप जाधव यांच्या हस्ते सपत्नीक नैवेद्य व महाआरती, दुपारी ३ ते ५ श्री दुर्गा सप्तपदी एकविरा देवी महिला भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी सातवाजता भाजपा कामगार आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरज राधेश्याम अहिरराव सपत्नीक महाआरती होईल सायंकाळी ७ ते ८ सामुहिक तुळशीविवाह भूषण महाराज आर्वीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. रात्री आठ वाजता ह.भ.प. मच्छिंद्र महाराज भोकर यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भाविकांनी दर्शनाचा व विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिराचे विश्वस्त अॅड.किशोर जाधव व आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
तिसगाव येथे सप्ताहाचे आयोजन
तिसगाव- येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्तिक शु. ६ शनिवार २ नोव्हेंबरपासून सप्ताहास सुरुवात झाली असून सप्ताहाची सांगता ९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार ८ रोजी दुपारी दोन ते सायंकाळी सहा दरम्यान पांडुरंगाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. सप्ताहानिमित्त विविध कीर्तनकारांचे किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाच्या शेवटी शनिवार ९ रोजी सकाळी ९ ते ११ ह.भ.प. धनश्री महाराज भडगांवकर यांचे काल्याचे किर्तन होईल.