साखरपुड्याच्या खरेदीसाठी ग्रामस्थांची उडतेय झुंबड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 21:50 IST2020-08-07T21:50:18+5:302020-08-07T21:50:37+5:30
शासन नियमांची पायमल्ली : बाजारपेठेत विनामास्क सर्रास वावर

साखरपुड्याच्या खरेदीसाठी ग्रामस्थांची उडतेय झुंबड!
धुळे : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या पातळीवरुन प्रयत्न सुरु असताना नागरिकांनी देखील प्रतिसाद देणे गरजेचे आहे़ मात्र ग्रामीण भागातील जनतेकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र सध्या शहरातील बाजारपेठेत पहावयास मिळत आहे़ विनामास्क वावर आणि अनावश्यक गर्दी होत असल्याने शासन नियमांची एकप्रकारे पायमल्लीच असल्याचे अधोरेखित होत आहे़ हे रोखण्यासाठी कोणत्याही प्रशासकीय यंत्रणा नसल्याचे चित्र स्पष्ट आहे़
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे़ तो रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत़ सुरुवातीच्या काळात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले़ त्यामुळे शहरातील बाजारपेठेसह सर्वच व्यवहार ठप्प होते़ कालांतराने त्यात बदल करण्यात आल्यामुळे अनलॉकचा काळ सुरु झाला़ त्यातही काही अटी-शर्थी लावण्यात आल्या होत्या़ त्या अनुषंगाने बाजारपेठेतील व्यवहारांना सुरुवात झाली़ त्यात मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, गर्दी टाळणे असे काही प्राथमिक निकषाच्या आधारावर व्यवहार पूर्ववत करण्यात आले़ असे असूनही सध्याच्या परिस्थितीत बिनधास्तपणे आणि ते ही विनामास्क वावरणाऱ्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही़ बाजारपेठेत अनावश्यक गर्दी वाढत आहे़ ती रोखण्यासाठी कोणाकडेही ठोस पर्याय उपलब्ध नसल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे़
महापालिकेच्यावतीने वेळोवेळी बाजारपेठेत मोहीम राबवून सम-विषम संख्येप्रमाणे दुकाने सुरु आहेत की बंद आहेत आणि विनामास्क कोणी फिरत आहेत का, याचाही शोध घेऊन संबंधितांवर जागेवरच दंडात्मक कारवाई केली जात आहे़ हजारो लोकांवर कारवाई करुन त्यांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे़
अशी काहीसी स्थिती असताना आणि कारवाई होऊ शकते हे माहित असताना देखील त्याची कोणत्याही प्रकारची भीती ग्रामीण जनतेमध्ये दिसून येत नसल्याचे समोर येत आहे़ लग्नातच नाही तर अंत्ययात्रेला देखील मोजक्याच लोकांना परवानगी देण्यात आलेली आहे़ जास्तीचे लोकं दिसल्यास कारवाईचे संकेत आहेत़ हे देखील माहित असून देखील साखरपुडा आणि त्याची खरेदी करण्यासाठी ग्रामीण जनतेची अक्षरश: झुंबड उडत आहे़ ही छोटीशी वाटणारी बाब मात्र याकडे कोणीही गांभिर्याने घेताना दिसून येत नाही़
ग्रामीण जनतेला एकतर कोरोनाची भीती वाटत नसावी, अथवा इतके प्रबोधन आणि जनजागृती सुरु आहे त्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचत नसावी अशी शक्यता आहे़ प्रबोधन हे तळागाळापर्यंत झाले पाहिजे़ तरच ग्रामीण जनता त्या नुसार अंमलबजावणी करेल़ नाहीतर गर्दी वाढणार आणि रुग्ण संख्या वाढू शकते असा अंदाज यातून स्पष्ट होत आहे़