विविध कार्यक्रमांनी नवीन वर्षाचे केले स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 22:04 IST2020-01-01T22:03:57+5:302020-01-01T22:04:11+5:30
प्रबोधन, जनजागृती : विविध शाळा, महाविद्यालय, सामाजिक संघटनांचा सहभाग

Dhule
धुळे : सरत्या वर्षाला निरोप व नूतन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त विविध प्रबोधनात्मक व जनजागृती कार्यक्रमांवर अधिक भर देण्यात आला. यात तरुणाईचा मोठा सहभाग दिसून आला.
‘पालेशा’ विद्यार्थ्यांकडून देवस्थानाची स्वच्छता
धुळे- येथील मा.ध. पालेशा वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिर दत्तकगाव रावेर येथे सुरु आहे. या शिबिरातील स्वयंसेवकांनी वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे ३१ डिसेंबर अनोख्या पध्दतीने साजरा केला. विद्यार्थ्यांनी शिबिराच्या सकाळच्या सत्रात रावेर जवळील देवस्थानास भेट दिली. तेथील परीसर स्वच्छ केला. देशभक्तीपर गीते गायीलीत. नविन वर्षासाठी संकल्प केला. तेथील देवतांचे आशीर्वाद घेतले. अशा अनोख्या पध्दतीने पालेशा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबारातील शिबिरार्थींनी जाणाऱ्या वर्षाला निरोप दिला.
निकम महाविद्यालयातर्फे जागृती
धुळे - वर्ष अखेरीचा जल्लोष आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईच्या उर्जेचा सकारात्मक उपयोग करून घेत येथील ओंकार बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष प्रा.रवींद्र ओंकार निकम यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालय, जयहिंद चौक, दत्तमंदिर चौक व लोकमान्य हॉस्पिटल जवळील परिसर येथे ‘सेल्फीद्वारे नवे वर्ष नवे संकल्प’ यावर जनजागृती अभियानाची सुरुवात केली. सदर अभियानाचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आले. सूत्रसंचलन प्रा.श्रीकांत कुलकर्णी यांनी केले. एकीकडे तरुणाई जल्लोषाचा तयारीत मग्न असताना या विद्यार्थ्यांनी एक विधायक पाऊल उचलत गत वर्षाला निरोप दिला. पथनाट्याद्वारे व सेल्फी पॉइंटद्वारे वाहतुकीचे नियम पाळण्याचा, सिंगल युज प्लास्टिक न वापरण्याचा, महिलांच्या सुरक्षेसाठी तत्पर असण्याचा व वाईट व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ घेऊन संकल्प करीत नव वर्षाचे स्वागतच केले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा.रवींद्र ओंकार निकम, संस्थेच्या सचिव शुभांगी निकम, प्राचार्य प्रकल्प पाटील, प्राचार्य सागर जाधव, प्राचार्य डॉ.राजेश अहिरराव, प्राचार्य चेतन पवार आदी उपस्थित होते. सदर अभियान अंतर्गत संस्थेतील सर्व विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्राचार्य प्रकल्प पाटील, प्राचार्य सागर जाधव, प्राचार्य डॉ .राजेश अहिरराव, प्राचार्य चेतन पवार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. यासाठी निकम ग्रुप आॅफ इन्सटीट्युट मधील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.