हॉटेल आदितीमध्ये तोडफोड, चाकू हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 21:43 IST2021-01-30T21:43:23+5:302021-01-30T21:43:49+5:30
धुळे तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद

dhule
धुळे : नागपूर - सुरत महामार्गावरील सांजोरी फाट्याजवळ असलेल्या जेवणाच्या बिलावरुन झालेल्या वादानंतर तोडफोड करण्यात आली. चाकूचा हल्लाही करण्यात आला. यात तरुण गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद नोंदविण्यात आला.
धुळे तालुक्यातील कुंडाणे वार येथे राहणारे शुभम अशोक सुडके (२३) या हॉटेल व्यावसायिकाने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास कुंडाणे शिवारात सांजोरी फाट्याजवळ असलेल्या सुडके यांच्या हॉटेल आदिती येथे अभय दिलीप अमृतसागर, रुपेश आप्पा साळवे, प्रदीप डिगंबर शेलार (सर्व रा. कुंडाणे ता. धुळे) हे जेवणासाठी आले. जेवणाचे बील देण्याच्या कारणावरुन या तिघांनी शुभम सुडके यांना हाताबुक्याने मारहाण केली. दमदाटी करुन सुडके यांच्या खिशातील ४ हजार रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावून घेतली. हॉटेलच्या पायऱ्या आणि आतमध्ये काचेच्या बाटल्याही फोडल्या. हॉटेल शेजारील झोपडीतील खुर्च्यांची मोडतोड केली.
तर, दुसºया गटातील अभय अमृतसागर (३०) यांनी फिर्याद दाखल केली. बिलाच्या कारणावरुन शुभम सुडके याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने काऊंटरजवळ ठेवलेला चाकू हातात धरुन अभय अमृतसागर याच्यावर वार केले. यात त्याच्या डोक्याला, मानेवर, गालावर, जखमा झाल्या आहेत. तसेच प्रदीप शेलार, रुपेश सावळे यांना हाताबुक्याने मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
हाणामाराी झाल्याची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप म्हैराळे, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहायक पोलीस निरीक्षक रुपेश काळे आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणाची नोंद धुळे तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.