जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सात केंद्रांवर सुरू होणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:34 IST2021-01-13T05:34:24+5:302021-01-13T05:34:24+5:30
धुळे : धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूवरील लसीकरण मोहिमेस १६ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मोहिमेचे परिपूर्ण नियोजन आरोग्य ...

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सात केंद्रांवर सुरू होणार लसीकरण
धुळे : धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूवरील लसीकरण मोहिमेस १६ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मोहिमेचे परिपूर्ण नियोजन आरोग्य विभागाने करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज सायंकाळी कोरोना लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजीज शेख, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, डॉ. विक्रम बांदल, जिल्हा शल्यचिकित्स्क डॉ. माणिक सांगळे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, डॉ. दीपक शेजवळ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील, डॉ. महेश मोरे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यादव म्हणाले, कोविडवरील लसीकरणाला मान्यता मिळाली आहे. त्यानुसार ८ जानेवारी रोजी धुळे जिल्ह्यात चार ठिकाणी ड्राय रन घेण्यात आला. आता १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरण मोहिमेस सुरुवात होईल. त्याचे नियोजन आरोग्य विभागाने करावे. लसीकरण केंद्रांवर शीतपेटी, लस वाहतुकीचे नियोजन करावे. पहिल्या टप्प्यात ज्या कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येईल त्यांना लसीकरणाची माहिती द्यावी. लसीकरण केंद्रावर आवश्यक साधनसामग्री, इंटरनेट, वीजपुरवठा, सुरक्षितता आदी बाबींची पडताळणी करून घ्यावी. लसीकरण केंद्रांवर लसीकरण अधिकारी एक ते पाच यांची नियुक्ती करण्यात येईल. लसीकरण करताना आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून खबरदारी बाळगावी. तसेच कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, अशा परिस्थितीत आरोग्य विभागाने चाचण्यांची संख्या वाढवावी, अशाही सूचना जिल्हाधिकारी यादव यांनी दिल्या.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून ग्रामीण भागात चार, तर शहरी भागातील तीन केंद्रांवर लसीकरण करण्यात येईल. त्यासाठी १० हजार १४७ आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रांवर दर दिवशी १०० जणांना कोविड लस देण्यात येईल. लसीकरणाची संपूर्ण तयारी झाली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले यांनी दिली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सांगळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील, डॉ. मोरे यांनी लसीकरणाची सविस्तर माहिती दिली.