तीन दिवसांपासून लसीकरण ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:39 IST2021-04-28T04:39:13+5:302021-04-28T04:39:13+5:30
शहराततील देसले ॲक्सिडेंट हॉस्पिटल व सुमालती हॉस्पिटल या दोन्ही खासगी हॉस्पिटलला कोरोना लसीकरण केंद्राची शासनमान्य परवानगी दिली ...

तीन दिवसांपासून लसीकरण ठप्प
शहराततील देसले ॲक्सिडेंट हॉस्पिटल व सुमालती हॉस्पिटल या दोन्ही खासगी हॉस्पिटलला कोरोना लसीकरण केंद्राची शासनमान्य परवानगी दिली आहे.
या ठिकाणी लसीकरणासाठी दररोज नोंदणी करून लस घेणाऱ्यांची मोठी गर्दी असते. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून साक्रीच्या दोन्ही खासगी हॉस्पिटलला लस शिल्लक नसल्यामुळे तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा मनस्ताप झाला आहे. या दोन्ही हॉस्पिटलमधून शेकडो जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. मात्र, कोव्हिशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठी अनेकांचे ४० दिवस उलटूनही लस मिळत नसल्यामुळे लोकांना काय करावे हेच सुचत नाही.
सरकारी हॉस्पिटलला मर्यादित लस असल्याचे सांगितले जात आहे, येथे लस मिळते आहे, मात्र चार ते पाच तास रांगेत उभे राहून लस घेणे व्याधिग्रस्त आणि ज्येष्ठ नागरिकांना जिवावर बेतणारे आहे. म्हणून या वयोगटातील लोकांना खासगीत लस सुविधा मिळाव्यात अशी अपेक्षा आहे.
‘लोकमत’ने जिल्हा आरोग्याधिकारी व तालुका आरोग्याधिकारी यांच्याशी संपर्क केला असता, तालुका आरोग्याधिकाऱ्यांनी लस एक-दोन दिवसांत उपलब्ध होईल असे सांगितले, तर जिल्हा अरोग्याधिकाऱ्यांनी खासगी हॉस्पिटलला यापुढे लस देण्याचे बंद करावे, असे आदेश शासनाचे आहेत. मात्र, संबंधित हॉस्पिटलला याबाबतीत लेखी सूचना मिळाली नसल्याचे सांगितले.
मात्र, खासगी लसींसाठी त्यांनी पैसे आधीच भरून ठेवले असल्यामुळे आम्हाला लस मिळायलाच हवी, असे खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.