१८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण बंद, लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठांचीच गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:35 IST2021-05-13T04:35:55+5:302021-05-13T04:35:55+5:30
धुळे : पुरेसे डोस मिळत नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...

१८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण बंद, लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठांचीच गर्दी
धुळे : पुरेसे डोस मिळत नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे बुधवारी जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांचीच गर्दी झाली होती.
जिल्ह्यात १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली होती. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे गरजेचे होते. मात्र, नोंदणी होत नसल्याच्या तक्रारी अनेक तरुणांनी केल्या होत्या. तसेच पुरेसे डोस उपलब्ध होत नसल्याने इच्छा असूनही अनेक तरुणांना कोरोनाची लस घेता आली नाही. त्यातच पुरेसे डोस मिळत नसल्याचे कारण देत राज्य शासनाने १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण बंद केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील केंद्रांवर केवळ ज्येष्ठ नागरिकांचेच लसीकरण करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस तीव्र होतो आहे. दैनंदिन बाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून घट झाली आहे. पण, मृत्यूचे सत्र अजूनही सुरूच आहे. दररोज जिल्ह्यातील सरासरी पाच ते सहा कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू होत आहेत. दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसला आहे. ग्रामीण भागात आढळणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. कोरोनापासून संरक्षण मिळण्यासाठी लस महत्त्वाचे शस्त्र आहे. लसीकरणाबाबत चांगली जनजागृती करण्यात शासनाला यश आले आहे. लस घेण्यासाठी नागरिक इच्छुक आहेत. त्यासाठी लसीकरण केंद्रांवर ते पहाटे पाच वाजल्यापासूनच गर्दी करत आहेत. पण एका लसीकरण केंद्रावर ८० ते १०० डोस उपलब्ध होत आहेत.
४५ वर्षांवरील २० टक्के लसीकरण पूर्ण -
जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील २० टक्के नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. ४५ वर्षांवरील ७ लाख २२ हजार नागरिकांपैकी १ लाख ४७ हजार जणांनी पहिला डोस घेतला आहे. पुरेशा संख्येत डोस प्राप्त झाले तर ४५ वर्षांवरील नागरिकांचे ६० टक्के लसीकरण लवकरच पूर्ण करू, असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी व्यक्त केला आहे.
ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर सकाळी ५ वाजल्यापासूनच रांगा -
ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर सकाळी पाच वाजल्यापासून नागरिक रांगा लावत असल्याचे चित्र आहे. मात्र, नोंदणी करण्यात अडचण येत असल्याने अनेकांना रांगेत उभे राहूनही लस मिळत नसल्याचे चित्र आहे. नोंदणी करण्याबाबत नागरिकांची समजूत घालताना आरोग्य कर्मचाऱ्यांची दमछाक होते आहे.
आतापर्यंत ३५ हजार डोस वाया -
१- आतापर्यंत जिल्ह्यात ३५ हजार डोस वाया गेले आहेत. एका कुपीत १० डोस असतात. त्यावेळी लसीकरण केंद्रावर जर सहा जण उपस्थित असतील तर चार डोस वाया जातात. लसीकरण मोहिमेच्या सुरुवातील डोस वाया जाण्याचे प्रमाण जास्त होते.
२- लसीकरणाबाबत जनजागृती झाल्यापासून डोस वाया जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आता तर उपलब्ध डोस अपूर्ण पडत आहेत. मंगळवारी ४०७ तर बुधवारी केवळ १३३ डोस वाया गेल्याची माहिती मिळाली.