रामसिंग नगरात एकास मारहाण लोखंडी रॉडसह काठ्यांचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 22:05 IST2020-08-17T22:05:23+5:302020-08-17T22:05:43+5:30
शिरपुरातील घटना : सहा जणांविरुध्द गुन्हा

रामसिंग नगरात एकास मारहाण लोखंडी रॉडसह काठ्यांचा वापर
धुळे : पूर्ववैमनस्यातून एकाला लोखंडी रॉडने तर, त्याला वाचविण्यासाठी आलेल्या दोघांना काठीने मारहाण केल्याची घटना १५ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शिरपुर येथील रामसिंग नगरात घडली़ याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात ६ जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल झाला़
शिरपुर तालुक्यातील उंटावद येथील अनिल जामसिंग पारधी (२६) या तरुणाला शिरपुर येथील रामसिंग नगरात फोन करुन बोलाविण्यात आले़ त्याच्यासोबत भाऊ राजेंद्र व भैय्या नामक दोघे होते़ अनिल हा येताच त्याच्याशी उज्जत घालत शाब्दिक वाद घालण्यात आला़ वादाचे पर्यवसान अचानक हाणामारीत झाल्याने रामसिंगनगरात काही प्रमाणात धावपळ उडाली़ या हाणामारीत लोखंडी रॉडचा सर्रासपणे वापर झाला़ अनिलचे हात धरुन दुसऱ्याने त्याच्या पायावर लोखंडी रॉडने वार केल्याने त्यात त्याला गंभीर दुखापत झाली़ हे पाहून त्याचा भाऊ राजेंद्र आणि भैय्या हे त्याला वाचविण्यासाठी आले असता त्यांच्यावर काठीने हल्ला चढविण्यात आला़ या हाणामारीत तिघांना दुखापत केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाले़ यानंतर तिघांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़
प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमी झालेल्या अनिल पारधीने शिरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ त्यानुसार लखन भील, अण्णा भील, मोहन भील (तिघे रा़ रामसिंग नगर, शिरपूर), मायकल (पूर्ण नाव माहित नाही), सतिष शिरसाठ, छगन कमलाकर शिरसाठ (दोन्ही रा़ खर्दे ता़ शिरपूर) यांच्या विरोधात भादंवि कलम १४३, ३२४, १४४, १४७, १४८, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जी़ एऩ सत्तेसा करीत आहेत़