अवकाळी पावसाने मालपूर परिसरातील वीटभट्टी व्यावसायिकांचे अतोनात नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:27 IST2021-01-10T04:27:44+5:302021-01-10T04:27:44+5:30
मालपूरसह परिसरात विटा बनविण्याचा व्यवसाय कोरोनामुळे अगोदर संकटात सापडला. त्यानंतर कसाबसा व्यवसाय सुरू केला तर मागील महिन्यातील अवकाळी पावसामुळे ...

अवकाळी पावसाने मालपूर परिसरातील वीटभट्टी व्यावसायिकांचे अतोनात नुकसान
मालपूरसह परिसरात विटा बनविण्याचा व्यवसाय कोरोनामुळे अगोदर संकटात सापडला. त्यानंतर कसाबसा व्यवसाय सुरू केला तर मागील महिन्यातील अवकाळी पावसामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्याचीच पुनरावृत्ती आता पुन्हा झाली आहे. अवकाळी पावसामुळे कच्चा, पक्क्या विटा पुरत्या भिजल्या असून, संपूर्ण वाया गेल्या आहेत. यामुळे लागलेल्या संपूर्ण मजुरीचे ओझे डोक्यावर बसले आहे. तसेच नुकतीच भट्टी लावलेल्यांचे भागभांडवलदेखील वाया गेल्याने या व्यावसायिकांचे कंबरडेच मोडले आहे.
या अचानक आलेल्या पावसामुळे तयार कच्च्या, विटा भिजून वाया गेल्या आहेत. सतत दोन दिवस पाऊस चालल्यामुळे पेटलेली भट्टी अर्धवट राहिल्यामुळे तो खर्चदेखील संपूर्ण वाया गेला आहे. कोरोनानंतर मोठ्या उमेदीने व्यावसायिक या व्यवसायाकडे वळले होते. मात्र, अवकाळी पावसाने सर्वकाही मातीत मिसळले आहे. वीट व्यावसायिकांना शासनाने आर्थिक मदतीचा हातभार द्यावा, अशी मागणी होत आहे.
इन्फो
योग्य माती आणून त्यात विविध घटकांचा समावेश करून विटा तयार करण्यासाठी माती तयार करावी लागते. यासाठी हातापायांच्या साहाय्याने माती तुडवून रात्रभर मुरू दिली जाते. भल्या पहाटे उठून पुन्हा मातीची मेहनत करुन विटा बनविण्यासाठी योग्य केली जाते. व त्यानंतर संपूर्ण कुटुंब एक एक विट थापत असतात. यानंतर सुकल्यावर एकत्रित रांग करून. भट्टी लावून कच्च्या विटा या भट्ट्यात भाजून पक्क्या केल्या जातात. मात्र, या उघड्यावरील व्यवसायाची सतत दोन दिवस झालेल्या संततधार अवकाळी पावसामुळे पुरती वाट लागली असून, त्यातून सावरणेदेखील मुश्किल झाले असल्याची व्यथा व्यावसायिकांनी मांडली.
कोट
अवकाळी पावसाने कच्च्या, पक्क्या तयार विटांचे अतोनात नुकसान झाल्याने आता काय करावे, हेच व्यावसायिकांना उमजत नाही. अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते केले आहे. मागील महिन्यातील संकटातून सावरत नाही तोच पुन्हा डोळ्यासमोर हे नुकसान पहावे लागल्यामुळे व्यावसायिक हतबल झाले आहेत. आता हा व्यवसाय करणे खूपच धोक्याचे झाले आहे. शासनाने आता तरी आमच्याकडे लक्ष द्यावे.
-पिंटू कुंभार, वीट व्यावसायिक, मालपूर