धुळ्यात तीन ठिकाणी एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 21:21 IST2020-12-13T21:21:33+5:302020-12-13T21:21:59+5:30
देवपुर पोलिसांनी दिली घटनास्थळी भेट, घटनांची नोंद मात्र पोलिसात नाही

धुळ्यात तीन ठिकाणी एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न
धुळे : धुळ्यात स्टेट बँकेचे तीन वेगवेगळ्या ठिकाणी असलेले एटीएम मशिन फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला़ ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली़ यात केवळ खोलीच्या दाराचे नुकसान झाले असून मशिन आणि त्यातील रक्कम सुदैवाने सुस्थितीत असल्याचे समोर आले आहे़ पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली़
स्टेट बँकेचे धुळे शहरात ठिकठिकाणी एटीएम मशीन कार्यान्वित आहेत़ आग्रा रोडवर देवपुरातील तलाठी कार्यालयाजवळ असलेले एटीएम मशिन, त्याच्या पुढे दत्त मंदिर परिसरात स्वामीनारायण मंदिराच्या रस्त्यावर असलेले एटीएम मशिन आणि गोंदूर रोडवर असलेल्या स्टेट बँक शाखेच्या शाखा शेजारील एटीएम असे तीन एटीएम मशिनकडे चोरट्यांनी लक्ष्य केंद्रीत केले़ एकही मशिन त्यांच्याकडून फुटलेले नाही़
एटीएम मशिनमध्ये शिरल्यानंतर चाहुल लागताच चोरटे पसार झाले़ त्यांच्या हाती काहीही लागले नाही़ घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील आपल्या सहकारीसह तीन ठिकाणी तातडीने पाहणी करण्यासाठी निघाले़ मात्र एटीएम मशिन फोडण्याचा प्रकार झाला नसल्याचे त्यांना दिसून आले़ दरम्यान, याप्रकरणी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कोणत्याही प्रकारची नोंद झालेली नव्हती़
दरम्यान, देवपूर हद्दीत दोन आणि पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अशा तीन ठिकाणी पहाटेच्या वेळेस काही इसम हे एटीएम मशिनमध्ये घुसले होते़ पण, कोणत्याही प्रकारचे नुकसान त्यांच्याकडून झालेले दिसत नाही़ या तीनही ठिकाणी मी स्वत: जावून पाहणी करुन आलो आहे़ असे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले़