बेशिस्त पार्किंग ठरतेय सर्वांसाठी डोकेदुखी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:24 IST2021-06-22T04:24:31+5:302021-06-22T04:24:31+5:30
शहराचा विस्तार हा पूर्वीपेक्षा आता झपाट्याने वाढत आहे़ परिणामी, लहानमोठ्या वाहनांची वर्दळदेखील वाढणे स्वाभाविक आहे़ शहरातील वाहतूक समस्येचा प्रश्न ...

बेशिस्त पार्किंग ठरतेय सर्वांसाठी डोकेदुखी!
शहराचा विस्तार हा पूर्वीपेक्षा आता झपाट्याने वाढत आहे़ परिणामी, लहानमोठ्या वाहनांची वर्दळदेखील वाढणे स्वाभाविक आहे़ शहरातील वाहतूक समस्येचा प्रश्न जटिल होत आहे़ वाहन पार्किंगची शिस्त नसल्याने बिनधास्तपणे नागरिक कुठेही अस्ताव्यस्त पार्किंग करत असल्यामुळे सर्वांनाच त्याची डोकेदुखी ठरली आहे़ दुसरीकडे पोलीस यंत्रणा कर्मचारीसंख्या कमी असल्याचे सांगते. त्यामुळे शिस्त कोण लावणार? हा मुळात प्रश्न आजही अनुत्तरीत आहे़ तसेच पार्किंगविषयी मनपाही उदासीन असल्याने, झोन नसल्याने वाहतूक सुरक्षाप्रश्नी बोंब कायम असल्याचे दिसून येत आहे़
पार्किंगची अंमलबजावणी
नागरिकांनी आपली वाहने एका रांगेत कोणालाही अडथळा होणार नाही, याची काळजी घेत लावणे आवश्यक आहे़ पण, मनाला पटेल अशा त-हेने वाहन लावून मोकळे होतात़ त्यातून येणा-या जाणा-यांना त्याचा त्रास होऊ शकतो, अपघातदेखील होऊ शकतो, याचा अंदाज घेतला जात नाही़ उलट कोणी बोलल्यास त्याला उद्धटपणे उत्तरे दिली जातात़ नागरिकांनी योग्य पार्किंगची अंमलबजावणी करावी.
वाहतूक सुरक्षेचा प्रश्नच
कोणत्याही प्रकारची सुरक्षितता आज वाहनधारकांच्या बाबतीत दिसून येत नाही़ त्यात सर्रासपणे आणि बेधडकपणे वाहने चालविली जातात़ त्यातून स्वत:ला अथवा दुस-याला दुखापत होऊ शकते, याची भीती वाहनधारकाला वाटत नाही़ पोलीस कठोर कारवाई करताना दिसत नाही. मनपानेही पार्किंगविषयी धोरणांकडे दुर्लक्षच केलेले आहे.
वाहनांची संख्या वाढतीच
शहरातील नागरिकांकडून वाहनांचा वापर होणे स्वाभाविक आहे़ सण-वार किंवा कोणता विशेष दिवस आल्यास वाहनांची संख्या वाढते़ त्याचा परिणाम दैनंदिन वाहतुकीवर होत आहे़ रोज हजारो वाहने रस्त्यावर धावताना दिसून येतात़ वाहनधारक आपले वाहन चालवत असताना त्यांनी शिस्तीचे पालन करणे अनिवार्य आहे़ पण, त्याचा अभाव दिसून येतो़
बेशिस्त पार्किंगची ठिकाणे
शहरातील अशी बरीच ठिकाणे आहेत, तिथे बिनधास्तपणे बेशिस्त पार्किंग केलेली आढळून येते़ त्यात पेठ भागातील गल्ली नंबर ६, खोल गल्ली, गरुड कॉम्प्लेक्स, तहसील कचेरीचा चौक, देवपुरातील सुशी नाल्याचा पूल यांचा समावेश होतो़ त्यातून त्या वाहनधारकांचा स्वयंशिस्तीचा अभाव प्रकर्षाने जाणवतो़
व्यावसायिक अशांना त्रासले
केवळ दोन मिनिटाचे काम आहे, असे सांगून सर्रासपणे पार्किंग करीत अनेक जणांकडून बेशिस्त पार्किंग केली जाते़ हे चुकीचे आहे, असे माहीत असूनदेखील त्याची आणि त्याच वाहनधारकांकडून पुन:पुन्हा अंमलबजावणीदेखील केली जाते़ अशांना टोकल्यास पुन्हा त्यांच्याकडून अरेरावीची भाषा वापरली जात असल्याने व्यावसायिक बेशिस्त पार्किंगला त्रासले आहेत़
- नागरिकांनी आपली वाहने पार्किंग करताना कोणालाही त्रास होणार नाही, अशी लावायला हवीत़ मात्र ब-याच जणांकडून याकडे दुर्लक्ष होते़
मोरेश्वर भलकार, धुळे
- वाहनधारकांनी आपले वाहन चालविताना किमान वाहतुकीचे नियम पाळावे़ वाहने लावताना ती शिस्तीत आहेत का, याची खातरजमा करावी़
दुर्गाप्रसाद जाधव, धुळे
- वर्दळीच्या ठिकाणी वाहने लावताना प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळावी़ त्याची आज गरज आहे़ परिणामी होणारे भविष्यातील अपघात कमी होतील़
अशोक चव्हाण, धुळे
- ज्या ठिकाणी वाहनांचा वावर जास्त आहे, अशा ठिकाणी वाहने लावताना त्यात शिस्त असावी़ मात्र, त्याचीच कमतरता प्रकर्षाने जाणवते़
अण्णा कणसे, धुळे