शिरपूर - तालुक्यातील मुंबई - आग्रा महामार्गावर सांगवी पोलीस आणि पुरवठा विभागाने मिळालेल्या गुप्त माहिती अनुसार दहिवद गावाजवळ एका हॉटेलच्या मागे धाड टाकून विना परवाना सुरु असलेला बोगस बायो डिझेल पंप सील करुन सुमारे २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आणि चार जणांविरुद्ध सांगवी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.सांगवी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना या बोगस बायो डिझेल पंपासंदर्भात गुप्त माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी प्रभारी पुरवठा निरीक्षक मायानंद भामरे यांच्यासोबत दहिवद गाव शिवारात हॉटेल आईसाहेब याच्या पाठीमागे सुरु असलेल्या बोगस बायो डिझेल पंपावर बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास धाड टाकली. याठिकाणी शासनाची कोणतीही परवानगी अगर लायसन्स नसतांना बायो डिझेलचा साठा करुन विक्री केली जात असल्याचे दिसून आले. या बोगस पंपावरुन २ लाख २६ हजार ८०० रुपये किंमतीचे ३ हजार १५० लिटर बायोडिझेल, २० हजार किंमतीचा पंप व साहित्य तसेच दोन मालट्रक एम.एच.१८ बी आर ५४२० व एम.एच.१८ एफ १७३ व पिकअप गाडी क्रमांक एम.एच.०२ एक्स ए ५५७५ असा एकूण २५ लाख ४६ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चंद्रसिंग रजेसिंग राजपूत (३८) रा. दहिवद, रामजीभाई तामलीया रा. सुरत, प्रकाशसिंग अमरसिंग सोलंकी रा. सुरत, मोहनसिंग अजबसिंग राजपूत रा.वरुळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी तहसीलदार आबा महाजन, डीवायएसपी अनिल माने यांनी भेट दिली.सदरची कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, पोसई नरेंद्र खैरनार, हेकॉ. लक्ष्मण गवळी, हेमंत पाटील, संजय देवरे, शामसिंग वळवी, पोलीस नाईक संजीव जाधव, अनारसिंग पवार, कॉन्स्टेबल योगेश दाभाडे, राजीव गिते, गोविंद कोळी, योगेश मोरे यांच्या पथकाने केली.
विना परवाना बोगस बायो डिझेल पंपावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 22:19 IST