जिल्ह्यातील महावितरणच्या कार्यालयांमध्ये अस्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:35 IST2021-01-20T04:35:24+5:302021-01-20T04:35:24+5:30
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नागरिकांना स्वच्छेतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृतीवर भर दिला जात आहे. असे असताना देखील बहूसंख्य ...

जिल्ह्यातील महावितरणच्या कार्यालयांमध्ये अस्वच्छता
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नागरिकांना स्वच्छेतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृतीवर भर दिला जात आहे. असे असताना देखील बहूसंख्य शासकीय कार्यालयांमध्ये अस्वच्छता झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील महावितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयासह लहान कार्यालयांत जाऊन ‘लोकमत’ने मंगळवारी पाहणी केली. महावितरण कंपनीचे साक्रीरोडवर मुख्य कार्यालय आहे. या कार्यालयांतर्गत महानगरात १४ कार्यालये आहेत. या कार्यालयांतून संपूर्ण कारभार पाहिला जातो. साक्रीरोडवरील वीजवितरण कंपनीच्या आवारात अधिकाऱ्यांच्या चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे, तर कर्मचारी व ग्राहकांच्या वाहनासाठी पार्किंग व्यवस्था नसल्याने परिसरात बेशिस्त पार्किंग दिसून आली. कार्यालयात मजल्यावर तुटलेल्या खुर्च्या, टेबल, पाण्याचे जार, विजेचे साहित्य तुटलेल्या अवस्थेत पडून आहे. त्यामुळे जिन्याचा वापर स्टोअररूमसाठी करण्यात आल्याने याठिकाणी अस्वच्छता झाली आहे. शाखा अभियंता यांच्या दालनाच्या आडाेशाचा वापर स्टोअररूमसाठी केला आहे.
या कार्यालयातील अधिकाऱ्यांचा परिसरात जरी स्वच्छता दिसून येत असली, तरी पाण्याची, सांडपाण्याची, पार्किंगची शिस्त प्रामुख्याने दिसून येत नाही. याठिकाणी ग्राहकांसाठी पाण्याची व्यवस्था गरजेची आहे.
प्रसाधनगृहाकडे दुर्लक्ष
वडजाईरोडवरील कार्यालयातील प्रसाधनगृहाची दुरवस्था झालेली आहे. या ठिकाणी नियमित स्वच्छता होत नसल्याने परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशाच वातावरणात कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे.
कार्यालयात अस्वच्छता
कार्यालयातील महत्त्वाच्या परिसरात स्वच्छता केली होती. त्यामुळे आडोशाचा वापर कचराकुंडीसाठी होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे डासांचा प्रार्दुभाव व घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे.
लालबाग कार्यालय जीर्ण
लालबाग वीजवितरण कंपनीचे कार्यालय कैलारू असल्याने पावसाळ्यात गळते. तसेच कार्यालय लहान असल्याने कर्मचाऱ्यांना अडचणी येतात. बाहेर साहित्य पडून असल्याने घाणीचे साम्राज्य झाले आहे.
महावितरण कंपनीचे कार्यालय व परिसरात नियमित स्वच्छता केली जाते. त्यासाठी पगारी स्वच्छता कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांना बसण्यासाठी खुर्च्या, टेबल असल्याने तुटलेल्या किंवा मोडकळीस आलेल्या नाहीत. बाहेर पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
- के. एस. बेळ्ळे
मुख्य कार्यकारी अभियंता, महावितरण