बुडताना आरडाओरड केली, पण कुणीच नसल्याने जीव गमावला
By देवेंद्र पाठक | Updated: October 31, 2023 18:14 IST2023-10-31T18:13:53+5:302023-10-31T18:14:00+5:30
तोंदे शिवारातील घटना : शेतातील डबक्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

बुडताना आरडाओरड केली, पण कुणीच नसल्याने जीव गमावला
धुळे : शेतशिवारात तयार करण्यात आलेल्या पाण्याच्या डबक्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शिरपूर तालुक्यातील ताेंदे शिवारात सोमवारी दुपारी घडली. प्रदीप रमेश पाटील (वय ३९) असे मृताचे नाव आहे. थाळनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. शिरपूर तालुक्यातील तोंदे येथे राहणारे प्रदीप रमेश पाटील (वय ३९) यांची गावशिवारात शेती आहे पण गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्यामुळे ते शेतात गेलेले नव्हते.
सोमवारी दुपारी शेतात गेल्यानंतर त्यांना पाण्याचे मोठे डबके दिसून आले. डबक्याची पाहणी करत असताना ते डबक्यात पडले. पाणी आणि गाळ जास्त असल्याने त्यात ते रुतले गेले. पाण्यात बुडत असताना त्यांनी आरडाओरड केली; पण परिसरात कोणीही नसल्याने त्यांना वाचविण्यासाठी काेणीही येऊ शकले नाही. ते पाण्यात पडून होते. ही घटना लक्षात येताच त्यांना तातडीने बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. थाळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस हेड कॉन्स्टेबल एस. के. वळवी घटनेचा तपास करीत आहेत.