धुळ्यातील शासकीय ग्रंथालयात १० वर्षानंतर पुस्तकांची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 11:51 IST2020-02-27T11:51:01+5:302020-02-27T11:51:34+5:30
जिल्हा नियोजन समितीमार्फत २५ लाखांचा निधी मंजूर

धुळ्यातील शासकीय ग्रंथालयात १० वर्षानंतर पुस्तकांची खरेदी
अतुल जोशी।
आॅनलाइन लोकमत
धुळे : भाषा संवर्धनाचे सर्वात महत्वाची भूमिका ग्रंथालये बजावित असतात. परंतु ग्रंथालयांनाही निधीची चणचण भासत पुस्तकांची खरेदी करता येत नाहीत. निधीअभावी धुळे शासकीय ग्रंथालयात तब्बल दहा वर्षांपासून पुस्तकांची खरेदीच झाली नव्हती. मात्र आता पुस्तके खरेदीसाठी तब्बल २५ लाखांचा निधी मंजूर झाला असून, त्यातून पाच ते दहा हजार पुस्तके, कादंबऱ्यांची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती शासकीय ग्रंथालय अधिकारी संजय मस्के यांनी दिली.
ग्रंथ हे आपले गुरू आहेत. ग्रंथ आपल्या आयुष्याला दिशा देण्याचे काम करतात. ग्रंथ हा असा खजिना आहे की, ज्याचा जितका उपयोग आपण करू, तितके आपणच समृद्ध होत असतो. धुळ्यात जिल्हा शासकीय ग्रंथालय आहे. सुरवातीला या ग्रंथालयासाठी पुस्तक खरेदीसाठी निधी मिळायचा. मात्र २००८-०९ पासून ग्रंथ खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीचा निधीच मिळाला नाही. परिणामी गेल्या १० वर्षात शासकीय ग्रंथालयासाठी पुस्तकांची खरेदीच झाली नाही. निधीअभावी ग्रंथालयात नवीन पुस्तके, कादंबºया आदींची भर पडू शकली नव्हती. ग्रंथसंपदेची संख्या ५४ हजारांवरच थांबलेली होती. दरम्यान शासकीय ग्रंथालयाला ग्रंथ खरेदीसाठी निधी मिळावा यासाठी अधिकाऱ्यांमार्फत सारखा प्रयत्न सुरू होता. त्याला आता यश मिळालेले आहे.
ग्रंथखरेदीसाठी २५ लाख मंजूर
जिल्हा नियोजन समितीकडून जानेवारी २०२० मध्ये पुस्तके खरेदीसाठी तब्बल २५ लाख रूपयांचा निधी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी मंजूर केला आहे.
सात-आठ हजार पुस्तकांची
खरेदी करणार
मंजूर झालेल्या निधीमधून ग्रंथालयासाठी सात ते आठ हजार विविध पुस्तक, ग्रंथांची खरेदी केली जाणार आहे. यात कथा, कादंबºयासोबतच स्पर्धा परीक्षांची पुस्तके, शेतीवर आधारित पुस्तकांची खरेदी करण्यात येणार आहे. यामुळे या ग्रंथालयाची ग्रंथसंपदा आता वाढणार असल्याचे सांगण्यात आले.
शासकीय ग्रंथालय अंतर्गत जिल्ह्यात २२२ वाचनालये आहेत. यात ‘अ’वर्गाचे ३६ आहेत.
ग्रंथालयात २००८-०९ पासून ग्रंथ खरेदी झालेली नव्हती. तब्बल १० वर्षानंतर ग्रंथ खरेदीसाठी २५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी जिल्हाधिकारी गंगाथरन डी.यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मंजूर झालेल्या निधीतून सात ते आठ हजार ग्रंथ, पुस्तकांची खरेदी लवकरच केली जाणार आहे. -संजय मस्के,
जिल्हा ग्रंथालय अधिकारी