तलावात बुडाल्याने दोन तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 21:03 IST2019-10-12T21:03:24+5:302019-10-12T21:03:47+5:30
नावरी येथील घटना, गावात व्यक्त होतेय हळहळ

तलावात बुडाल्याने दोन तरुणाचा मृत्यू
धुळे : गावातील पाझर तलावात पाय घसरुन दोन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना धुळे तालुक्यातील नावरी गावात शनिवारी दुपारी घडली़ अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते मनोहर पाटील यांनी दिली़ दरम्यान, या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे़
धुळे तालुक्यातील नावरी गावात राहणारे राकेश संजय पाटील (१९) आणि समाधान विनायक बागुल (१७) हे दोघे तरुण शनिवारी दुपारी शेतात कामानिमित्त गेले होते़ नावरी गावाजवळच पाझर तलाव असल्याने ते पाणी पिण्यासाठी या ठिकाणी गेल्याचे सांगण्यात येत आहे़ या भागात जमिन भुसभुसीत झाली असल्याने या दोघांचा तोल जावून ते पाण्यात पडले़ आरडा ओरड केला असता पण, जवळ कोणीही नसल्याने त्यांना वाचविण्यात अपयश आले़ घटना लक्षात आल्यानंतर त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले़ त्या दोघांचा मृतदेह शवविच्छेदन गृहात आणण्यात आला होता़ धुळे तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते़