कुत्रा आडवा आल्याने दुचाकी स्लिप, एक ठार; धुळे तालुक्यातील विंचूर फाट्यावरील घटना
By देवेंद्र पाठक | Updated: January 4, 2024 17:44 IST2024-01-04T17:44:11+5:302024-01-04T17:44:24+5:30
मंगळवारी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास घडला प्रकार

कुत्रा आडवा आल्याने दुचाकी स्लिप, एक ठार; धुळे तालुक्यातील विंचूर फाट्यावरील घटना
देवेंद्र पाठक, धुळे: धुळे ते चाळीसगाव रोडवरील विंचुर फाट्यानजीक भरधाव दुचाकीसमोर अचानक कुत्रा आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्न करत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटले. भरधाव दुचाकी घसरून अपघात झाला. ही घटना मंगळवारी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास घडली. गंभीर जखमी झालेल्या रमेश शांताराम पवार (रा. खोरदड, ता. धुळे) यांचा मृत्यू झाला.
मंगळवारी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास रमेश शांताराम पवार हे खोरदड गावातील नाना सखाराम पाटील यांच्या एमएच १८ सीबी ८९६५ क्रमांकाच्या दुचाकीवर मागे बसून धुळ्याकडे येत होते. त्यादरम्यान विंचूर फाट्याजवळ अचानक कुत्रा समोर आल्याने नाना पाटील यांनी जोराचा ब्रेक दाबला. त्यामुळे दुचाकी घसरून अपघात झाला. त्यात मागे बसलेले रमेश पवार यांना गंभीर दुखापत झाली. नाना पाटील हे ही जखमी झाले. गंभीर अवस्थेत रमेश पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला अधिक मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत सुधाकर गंजीधर देवरे (रा. वलवाडी, ता. धुळे) यांनी धुळे तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अपघातप्रकरणी दुचाकी चालक नाना पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक काळे करीत आहेत.