अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:32 IST2021-04-05T04:32:14+5:302021-04-05T04:32:14+5:30
वडजाई : फागणे-बाभूळवाडी रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दीपक नागो पाटील (वय २६, रा. साैंदाणे, ता. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
वडजाई : फागणे-बाभूळवाडी रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दीपक नागो पाटील (वय २६, रा. साैंदाणे, ता. धुळे) हा तरुण जागीच ठार झाला. रविवारी दुपारी हा अपघात झाला. वडिलांच्या जागेवर त्याला बॅंकेत नोकरी लागणार होती. परंतु तत्पूर्वी नियतीने त्याच्यावर घाला घातला. दीपक पाटील यांच्या मोठ्या बहिणीच्या सासूचे २० मार्च रोजी निधन झाल्याने संपूर्ण परिवार अंत्यविधीसाठी बाळद येथे गेला होता. अंत्यविधीनंतर कुटुंबातील सदस्य परतले. दशक्रिया विधीसाठी दीपक पाटील दोन दिवस आधीच मदतीसाठी गेला होता. हा विधी आटोपून तो आपल्या मोटारसायकलीने गावाकडे परत येत असताना फागणे ते बाभूळवाडी रस्त्यावर भरधाव येणाऱ्या अज्ञान वाहनाने वळण रस्त्यावर मोटारसायकलला जोरदार धडक दिली. तोंडाला व डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांनी फोनवरून संपर्क करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण गावाने घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, याबाबत मोहाडी पोलिसांशी संपर्क साधला असता ती हद्द आमची नसून तालुका पोलीस ठाण्याची आहे, असे सांगण्यात आले. मोहाडी पोलिसांनी तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. तालुका पोलीस दोन ते तीन तास उशिरा घटनास्थळी पोहोचल्याने तीन तास मृतदेह घटनास्थळी पडून होता. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
मयत दीपक पाटील याचे वडील बॅंकेत नोकरीला होते. त्यांचे आधीच निधन झाले आहे. त्यांच्या जागेवर दोन ते तीन महिन्यात दीपकला नोकरी लागणार होती. त्यासाठी त्याचा पाठपुरावादेखील सुरू होता. परंतु त्याआधीच त्याला मृत्यूने गाठल्याने गावासह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.