दुचाकी ट्रकवर आदळल्याने अपघात, पती ठार, पत्नी व मुलगा रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 21:22 IST2020-12-17T21:21:40+5:302020-12-17T21:22:47+5:30
फागण्याजवळील घटनेनंतर दोन्ही बाजूंची वाहतूक खोळंबली

दुचाकी ट्रकवर आदळल्याने अपघात, पती ठार, पत्नी व मुलगा रुग्णालयात
धुळे : फागण्याकडून धुळ्याच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीचे पुढील चाक निखळल्याने तोल सुटल्याने दुचाकीस्वार समोरुन येणाऱ्या ट्रकवर आदळल्याने झालेल्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर, त्याची पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताची ही घटना नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील फागणे गावात सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.
एमपी ४६ एमआर ४६९५ क्रमांकाची दुचाकीवरुन पती-पत्नी व मुलगा असे तीन जण फागणे गावाकडून धुळ्याच्या दिशेने येत होते. पुढे ते मध्यप्रदेशाकडे जात असताना नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील फागणे गावाजवळ दुचाकीचे पुढील चाक निखळले. त्यामुळे वेगात असलेल्या दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्याचवेळेस धुळ्याकडून जळगावच्या दिशेने जाणारा एमएच १८ बीजी ४०२० क्रमांकाच्या ट्रकवर दुचाकी जावून आदळली. दुचाकीवरील चालक धिरज झजाज्या पावरा (२५, रा.सेंधवा, मध्यप्रदेश) हा ट्रकवर आदळल्याने त्याच्या डोक्याला ट्रकचा लोखंडी भाग लागला आणि त्यानंतर तो जमिनीवर फेकला गेल्याने पुन्हा त्याच्या डोक्याला मार लागल्याने रक्तबंबाळ झालेल्या धिरजचा जागीच मृत्यू झाला.
अपघात झाल्याचे लक्षात येताच या भागातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी आणि मृत व्यक्तीला रुग्णवाहिकेने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. धिरज याला तपासून डॉक्टरांनी मृत घोषीत केले. तर त्याची पत्नी आणि मुलावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. अपघातानंतर ट्रकचालकाने आपले वाहन थोडे पुढे नेवून पेट्रोल पंपाजवळ लावले. यावेळेस दोन्ही बाजुंची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली होती. महामार्ग पोलीस आणि धुळे तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.