साक्री रोडवर सिंधी व्यापाऱ्यासह दोघांना लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 21:21 IST2021-03-30T21:21:20+5:302021-03-30T21:21:48+5:30
धुळे तालुका पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या फिर्यादी

साक्री रोडवर सिंधी व्यापाऱ्यासह दोघांना लुटले
धुळे : साक्री रोडवर एकाच रात्री दोन जणांना बेदम मारहाण करीत तिघा लुटारूंनी लुटल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.
नरेश ऊर्फ साई साधुराम माटा (५५, रा. कुमारनगर, धुळे) या व्यापाऱ्याला २७ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अनोळखी तीन जणांनी धुळे ते साक्री रोडवरील आनंदखेडे गावाच्या पुढे हाॅटेल साई भगवान हॉटेलजवळ अडवून मारहाण करीत लूटमार केली. मोटरसायकलीवरून आलेल्या तिघांनी नरेश माटा यांना अडवून मारहाण करून त्यांच्या पॅन्टच्या खिशातील १ हजार ५०० रुपये, ५ हजाराचा मोबाईल, किराणा सामान आणि दुचाकीची चावी हिसकावून घेत पसार झाले. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
याच पध्दतीने शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास धुळे ते साक्री रोडवरील इच्छापूर्ती गणपती मंदिराजवळ मोटरसायकलीवरून जात असलेल्या स्वप्निल अशोक यादबोले (गवळी) (२१, रा. गोळीबारी टेकडीजवळ, धुळे) या तरुणाला अडवून तिघांनी लुटले. लाथबुक्क्यांनी मारहाण करीत तसेच चाकूने डोक्यावर वार करीत गंभीर जखमी करीत पॅन्टच्या खिशातून ७ हजार ७५० रुपये, १० हजाराचा मोबाइल आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग असा एकूण १७ हजार ७५० रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.