पंजाबराव राठोडांच्या शोधासाठी दोन पथके रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 22:11 IST2020-12-12T22:10:38+5:302020-12-12T22:11:02+5:30
मोहन मराठे मृत्यू प्रकरण : अटकेतील तिघा पोलिसांना कोठडी, एकाचे निलंबन

पंजाबराव राठोडांच्या शोधासाठी दोन पथके रवाना
दोंडाईचा : येथील मोहन मराठे मृत्यू प्रकरणी अटकेतील तिघा पोलिसांना शिंदखेडा न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना १६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़ तर, फरार असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक पंजाबराव राठोड यांच्या शोधासाठी २ पथके रवाना करण्यात आली़ तर एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले़
गिरीधारीलाल नांनकराम रुपचंदानी यांच्या आॅइल मिल मध्ये ४ आॅक्टोबरला १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे ८६ तांदळाचे कट्टे चोरीस गेले होते. या चोरी प्रकरणाचा तपास पोलीस कर्मचारी वासुदेव गोविंद जगदाळे यांच्याकडे होता. या तांदूळ चोरी प्रकरणात दोंडाईचा पोलिसांनी मोहन मराठे या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच दिवशी ७ आॅक्टोबर ला मोहन मराठे यांचा मृतदेह शहादा रस्त्यावर संशयास्पद स्थितीत आढळून आला होता.
त्या प्रकरणाचा तपास सीआयडी अर्थात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधीक्षक रविकिरण तुकाराम दरवडे यांच्याकडे सोपविण्यात आला़ यात संशयित आरोपी तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक पंजाबराव जांनकिराम राठोड, पोलीस कर्मचारी वासुदेव गोविंद जगदाळे, सीताराम दामू निकम, राहुल नंदलाल सोनवणे दोषी आढळलेत. तिघा संशयित पोलिसांना शुक्रवारी सीआयडीने अटक केली़ तपासाधिकारी तथा नंदुरबार सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र भावसार यांनी संशयित तिघा पोलिसांना शिंदखेडा न्यायालयात हजर केले. तपासाधिकारी भावसार यांनी आरोपींना पोलीस कोठडी कशी आवश्यक आहे, ते न्यायालयात मांडले. संशयित आरोपींकडून अॅड़ पी़ जी़ पाटील यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर शिंदखेडा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी आरोपींना १६ डिसेंबर पावेतो पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत.
दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपी पंजाबराव राठोड अद्याप फरार असून त्यांच्या शोधासाठी सीआयडीने दोन पथक सज्ज केली असून त्यांना रवाना करण्यात आले आहे़ या प्रकरणातील संशयित वासुदेव जगदाळे या पोलिस कर्मचाºयाला निलंबित करण्यात आले़