दोन शाळेतील घरफोडी धुळे एलसीबीने केली उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 17:02 IST2021-02-07T17:02:17+5:302021-02-07T17:02:40+5:30
साक्री तालुका : शेतातील झोपडीत चाऱ्याच्या खाली लपवून ठेवलेला लाखांचा मुद्देमाल केला जप्त

दोन शाळेतील घरफोडी धुळे एलसीबीने केली उघड
धुळे : साक्री तालुक्यातील दिघावे आणि बल्हाणे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झालेल्या चोरीप्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने लावला आहे. एका संशयितांसह दोन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीला गेलेले ९५ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, या चोरी प्रकरणात अजून कोणाचा समावेश आहे का या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोरी, घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल झालेले असून समांतर तपास सुरु होता. अशातच साक्री तालुक्यातील कडळी येथील विशाल धनराज भोये याच्याकडे काहीही कामधंदा नाही, तरीही तो मागील एक महिन्यापासून मौजमजा करीत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली. त्यानुसार त्याचा संशयावरुन शोध घेण्यात आला. नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर साक्री तालुक्यातील शेवाळी फाट्यावर विशाल भोये हा येणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच सापळा लावण्यात आला. त्याला ताब्यात घेवून त्याची चौकशी केली असता त्याने साक्री तालुक्यातील दिघावे आणि बल्हाणे येथील न्यू इंग्लीश स्कूलमध्ये साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली पोलिसांच्या तपासात दिली. तसेच चोरलेला ऐवज हा साक्री तालुक्यातील पापडीपाडा येथील मालकीच्या शेतातील झोपडीमधील चाऱ्याच्याखाली लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी या ठिकाणी जावून टीव्हीसह संगणक, सीपीयू, प्रिंटर असा मुद्देमाल जप्त केला आहे. यात साक्री पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील ७३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल आणि पिंपळनेर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील २१ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल असा एकूण ९५ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहायक पोलीस निरीक्षक संदिप पाटील, पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, कर्मचारी रफिक पठाण, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, गौतम सपकाळे, राहुल सानप, सुनील पाटील, श्रीशैल जाधव, विलास पाटील, दीपक पाटील यांनी कारवाई केली. पकडण्यात आलेल्या संशयितांना साक्री पोलीस ठाण्यात मुद्देमालासह हजर करण्यात आले आहे. पुढील तपास सुरु आहे.