धुळे जिल्ह्यात ३५१ कुपोषित बालके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 11:52 IST2019-08-07T11:51:45+5:302019-08-07T11:52:41+5:30
ग्रामबालविकास केंद्रात दाखल केले तीव्र कुपोषित बालक, नियमित आहार दिला जातो

धुळे जिल्ह्यात ३५१ कुपोषित बालके
आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्ह्यात शुन्य ते सहा वर्षे वयोगटातील तब्बल पावणेदोन लाख बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यातून जिल्ह्यात ३५१ तीव्र तर १ हजार ३२३ बालके मध्यमस्वरूपाचे कुपोषित बालके आढळून आले आहेत. तीव्र कुपोषित असलेल्या बालकांचे वजन वाढवून त्यांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी जिल्ह्यातील २२७ ग्रामबालविकास केंद्रात दाखल केले आहे. या बालकांना अतिरिक्त आहार देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेतील एकात्मिक बालविकास विभागातून देण्यात आली.
धुळे जिल्ह्यात असलेल्या महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयांतर्गत २१०४ अंगणवाड्या आहेत. जिल्ह्यातील शुन्य ते सहा वर्षे वयोगटातील १ लाख ७३ हजार ८०६ बालकांची सुरुवातीला अंगणवाड्यांमधील पर्यवेक्षिकांमार्फत वजन तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर या बालकांची पुन्हा आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात आली. त्यात ३५१ बालके तीव्र कुपोषित आढळले. ते वजन, वय व उंचीच्या प्रमाणात कमी आढळले.
तीन महिने ठेवणार
कमी वजन असलेल्या बालकांचे वजन वाढवून त्यांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी जिल्ह्यात ग्रामबालविकास केंद्र सुरू करण्यात आलेली आहे. ग्रामबालविकास केंद्रात शुन्य ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना दाखल करण्यात येते. पूर्वी एकच महिना तीव्र कुपोषित बालक बालविकास केंद्रात असायचा.
आता मात्र या बालकांना तीन महिने या केंद्रात ठेवण्यात येणार आहे. धुळे जिल्ह्यात जून ते सप्टेंबर २०१९ या कालावधीसाठी दहा प्रकल्पांतर्गत २२७ ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. या बालकांना नियमित आहार दिला जात आहे.