दोंडाईचा पोलीस ठाण्यातील जमावाला पांगविण्यासाठी गोळीबार, दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 12:28 IST2021-04-01T12:28:32+5:302021-04-01T12:28:59+5:30
अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने दोन गटात धुमश्चक्री, वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल, पोलीस बंदोबस्त वाढविला

दोंडाईचा पोलीस ठाण्यातील जमावाला पांगविण्यासाठी गोळीबार, दोन जखमी
धुळे : अल्पवयीन मुलीची छेड काढलेल्या संशयित आरोपींच्या समर्थकांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यावर दगडफेक करीत पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री घडली़ हिंसक झालेल्या जमावाला पांगविण्यासाठी पोलीस निरीक्षकाने केलेल्या गोळीबारात दोन जखमी झाले आहेत़ तर जमावाच्या हल्ल्यात पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस जखमी झाले़ या गोळीबारातील जखमींना पाहण्यासाठी रुग्णालयात दोन जमाव समोरासमोर आले़ येथे झालेल्या हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू झाला़ या घटनेमुळे दोंडाईचा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे़
दोंडाईचा येथील एका अल्पवयीन मुलीची छेड दोन मुलांनी काढली़ हा प्रकार पिडीत मुलीने तिच्या भावाला सांगितला़ त्याने छेड काढणाºया दोघा मुलांना चांगलाच चोप दिला़ दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले़ याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोक्सो कायद्यान्वये दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते़ याच दरम्यान, संशयित आरोपींचे समर्थक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात आले़ जमावाने पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे व अन्य कर्मचाऱ्यांवर दडपण आणून हुज्जत घालण्यास सुरुवात केली़ यावेळी दोंडाईचा पोलीस ठाण्यात मोजकेच कर्मचारी उपस्थित होते़ जमावाला अटकाव करताना काही वेळातच हा वाद हाताबाहेर गेला़ जमावाने पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे व कर्मचाºयांवर हल्ला केला़ त्यामुळे ज्ञानेश्वर वारे यांनी त्यांच्या पिस्तुलातून गोळीबार केला़ यात दोघे जण जखमी झाले़ गोळीबारामुळे जमाव पोलीस ठाण्याच्या परिसरातून पळाला़ या हाणामारीत वारे यांच्यासह दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले़
पोलिसांनी केलेल्या गोळीबारातील जखमींना दोंडाईचा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले़ त्या ठिकाणी पोलीस ठाण्यात धिंगाणा घालणारा मोठा गट पुन्हा आला़ या जमावाने पुन्हा रुग्णालयात धुडगूस घातला़ या दवाखान्यात कोरोनाचे रुग्ण उपचार घेत असल्याने त्यांना बाधितांच्या नातेवाईकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले़ काहीवेळातच पुन्हा एकदा दोन गटात हाणामारी सुरु झाली़ यामध्ये दोंडाईचा येथील एक तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला़
या घटनेची माहिती कळताच नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत हे घटनास्थळी दाखल झाले आहेत़ याप्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु झाले आहे़ पोलीस ठाण्यासह रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली जात असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे़