दोंडाईचा येथील खूनप्रकरणी नंदुरबार येथून दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 21:45 IST2021-04-04T21:44:34+5:302021-04-04T21:45:02+5:30
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक

दोंडाईचा येथील खूनप्रकरणी नंदुरबार येथून दोघांना अटक
धुळे : दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालयात दोन गटातील जमाव एकमेकांवर भिडल्याने झालेल्या हाणामारीत एका तरुणाचा खून झाला होता. याप्रकरणातील दोन संशयितांना नंदुरबार येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. दरम्यान, या प्रकरणातील इतर फरार असलेल्या संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.
अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी अटकेतील दोघांना सोडविण्यासाठी जमावाने दोंडाईचा पोलीस स्टेशनवर चाल करीत हल्ला केला. भरकटलेल्या जमावाने पोलीस स्टेशनवर दगडफेक करीत पोलिसांनाही मारहाण केली होती. जमावाने दोघा आरोपींना पळवून नेत असताना पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी गोळीबार केला. त्यात दोन जणांना गोळी लागल्याने ते जखमी झाले. त्यांना लागलीच उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी दोन गटातील जमाव एकमेकांना भिडला. त्यात शाहबाज शाह गुलाब शाह (४५) यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेत पोलीस अधिकाऱ्यांसह पाच कर्मचारी देखील जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी व पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. यानंतर दोंडाईचा पोलीस ठाण्यात वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दोंडाईचा येथे घडलेले प्रकरण अतिशय संवेदनशील असल्यामुळे प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे. तपासाच्या अनुषंगाने जमावातील काही जण नंदुरबार येथे लपले असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक बुधवंत यांना मिळाली. माहिती मिळताच पथकाने नंदुरबार येथे जावून हर्षल नरेंद्र चौधरी आणि हरीष मोहन कोळी (रा. दोंडाईचा) या दोन संशयितांना अटक केली. दरम्यान, या प्रकरणातील अन्य संशयित फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.