सव्वा लाख वृक्षांची होणार लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:16 IST2019-05-21T23:15:44+5:302019-05-21T23:16:52+5:30
महापालिका : जुलै महिन्यात प्रभागनिहाय लागवड, २४९ जागा निश्चित, प्रशासन करतेय जय्यत तयारी

dhule
धुळे : शासनाच्या वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत महापालिका प्रशासनाकडून यंदा तब्बल एक लाख २६ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ त्यानुषंगाने मनपा प्रशासनाने शहरातील १७८ मोकळया जागांवर वृक्षलागवड करण्याचा निर्णय घेतला आहे़ शहरात एकूण १६़ ८९ हेक्टर जागेवर जुनच्या पहिल्या आठवड्यात वृक्षलागवड केली जाणार आहे़
राज्य शासनाच्या वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत दरवर्षी पावसाळ्यात वृक्षलागवड करण्यात येणार आहे़ त्यासाठी यंदा महापालिकेला एक लाख २६ हजार ४०० वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ त्यासाठी महापालिकेच्या विविध शासकीय विभागांना उदिष्ठे देण्यात आले आहे़ गेल्या दोनवर्षाच्या तुलनेत सर्वाधिक वृक्षलागवडीचे उदिष्ठे मनपा देण्यात आले आहे़ पुर्वनियोजनाबाबत घेण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची बैठक नियोजन व जबाबदारी सोपविण्यात आली आहे़
वृक्षलागवड मोहीमेव्दारे शहरातील टॉवर बगिचा, पांझरा जल केंद्राच्या आवारात, महापालिकेच्या जागा, आरोग्य केंद्र, मनपा क्षेत्रातील सर्व १९ प्रभाग शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाण, अमरधाम, हद्दवाढ क्षेत्रातील अवधान, वरखेडी, चितोड, नकाणे, बाळापुर, प्रिंपी, मंहिदळे, आदी ठिकाणी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे़ दरम्यान, शासनाने येत्या जुलै महिन्यात राबविण्यात येणाºया वृक्ष लागवड मोहिमेव्दारे शहरातील एकूण २४९ जागांवर वृक्षलागवडीचे नियोजन आहे़
प्रत्येक प्रभागाला ‘टार्गेट’
वृक्षलागवडीसाठी शहरातील प्रत्येक प्रभागाला उद्दिष्ट दिले जाणार असून रोपे देखील पुरविली जाणार आहेत़ शिवाय लागवड झालेल्या वृक्षांचे ‘जिओ टॅग’ फोटो शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केले जाणार आहेत़ प्रत्येक प्रभागाला जागेच्या उपलब्धतेनुसार वृक्षांचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यानुसारच रोपांचे वितरण होणार आहे़
२५ समन्वयकांची नियुक्ती
महापालिकेच्या उपलब्ध मनुष्यबळातुन कनिष्ठ अभियंता, सहाय्यक सार्वजनिक आरोग्यधिकारी, स्वच्छता निरीक्षक, लिपीक अशा एकून २६ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ नियुक्त करण्यात आलेल्या समन्वयकांना प्रत्येकी चार हजार ८६८ वृक्ष लागवडीचे उदिष्ठे देण्यात आले आहे़ त्यासाठी खड्डे खोदण्याचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे़
लोकसहभाग होणार वृक्षलागवड
वृक्षलागवडीची मोहिम केवळ शहरातच नव्हे तर जिल्हाभरात राबविली जाणार आहे़ लागवडीसाठी वनविभागाकडून स्टॉल टाकण्यात येणार आहे़ वृक्षलागवडीसाठी प्रशासनाकडून जनजागृतीसाठी केली जाणार आहे़
गेल्यावर्षी मनपाला खड्डे
बुजण्याची नामुष्की
दोन वर्षापूर्वी मनपाने रोपांची मागणी नोंदवूनही रोपे न मिळाल्याने खोदलेले खड्डे बुजविण्याची नामुष्की मनपा प्रशासनावर ओढवली होती़ त्यामुळे गेल्या वर्षी उद्दिष्टापेक्षा अधिक रोपे खरेदी करण्यात आली़
विविध वृक्षांचा समावेश
यंदा प्रशासनाकडून वृक्ष लागवडीचे उदिष्टे वाढविण्यात आले आहे़ त्यामुळे विविध जातीचे वृक्ष प्राप्त होणार आहे़ त्यात कडूलिंब, वड, पिंपळाची जास्तीत जास्त झाडे लावली जाणार आहेत़ गेल्या वर्षी लावलेल्या झाडांपैकी किती झाडे जगली, याची आकडेवारी मात्र उपलब्ध नाही़ त्यामुळे वृक्ष लागवडीपेक्षा नियोजनाची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे़